रस्ता खुला करा, दोषींवर कारवाई करा – महिलांचा निर्धार

सोनेवाडीत रस्ता अडविल्याने महिलांचे बेमुदत उपोषण सुरू

26 जानेवारी  उपोषणाचा तिसरा दिवस, दोषींवर कारवाईची मागणी



चिखली /( गोपाल वाळेकर ) :- चिखली तालुक्यातील मौजे सोनेवाडी येथे गट नं. 10 मधून जाणाऱ्या शेतरस्त्यावरून वाद पेटला आहे. प्रशासनाने पोलीस संरक्षणात तात्पुरता खुला केलेला हा रस्ता पुन्हा एकदा अडवला गेल्याने शेतकरी महिलांनी दि. 24 जानेवारीपासून तलावाच्या सांडव्यात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. रस्ता खुला करण्यासह दोषींवर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे. "जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही," अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.

प्रशासनाच्या आदेशानंतरही कार्यवाहीचा अभाव

तहसीलदारांनी यापूर्वी घेतलेल्या बैठकीत जलसंधारण विभाग, ग्रामपंचायत आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना रस्ता मोकळा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, अद्यापही जलसंधारण विभागाने कुठलीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
विशेष म्हणजे, या प्रकरणात सोनेवाडी येथील कांताबाई शंकर डवळे या महिलेने सांडव्यात रस्ता पेरणीसाठी वापरल्याचा व सतत रस्त्यावर अडथळे निर्माण केल्याचा दावा केला जात आहे. "सांडव्यात रस्त्यावर पेरणी करणे, काटे टाकणे, व शेतीसाठी रस्त्यावर अडथळे उभे करणे यावर जलसंधारण विभागाने फक्त नोटिसा बजावल्या, मात्र प्रत्यक्ष कारवाई केली नाही," असा संताप शेतकरी महिलांनी व्यक्त केला आहे.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या

  • सोनेवाडी ते पांगरी हा रस्ता तात्काळ मोकळा करण्यात यावा.
  • रस्ता अडविणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
  • तलाव बाधित सांडव्यातील पर्यायी रस्ता कायमस्वरूपी देण्यात यावा.

आमदार व शेतकरी नेत्यांनी यापूर्वी सोडवलेले आंदोलन पुन्हा पेटले

ऑगस्ट महिन्यातही शेतकरी महिलांनी याच मुद्द्यावर आंदोलन केले होते. तेव्हा आमदार श्वेताताई महाले, शेतकरी नेते रविकांत तुपकर, विनायक सरनाईक आणि नितीन राजपूत यांनी मध्यस्थी करत उपोषण सोडवले होते. प्रशासनाने रस्ता खुला केला होता आणि संबंधित महिलेस समज देण्यात आली होती. मात्र, पुन्हा एकदा रस्ता अडवल्यामुळे प्रशासनाची कारवाई निष्क्रिय ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

सांडवा अडविण्याच्या मुद्द्यावर जलसंधारण विभागावरही टीका

सांडव्यात रस्त्यावर पेरणी व अडथळे निर्माण केल्याप्रकरणी जलसंधारण विभागाने फक्त नोटिसा बजावल्या आहेत. "महिलेने नोटिसांकडे दुर्लक्ष केले असूनही विभाग काहीही कारवाई करत नाही," असे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. जलसंधारण विभागाकडून अडथळा निर्माण करणाऱ्या महिलेच्या वर्तनावर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

प्रशासनाची भेट आणि शेतकऱ्यांचे आक्रमक पवित्रा

26 जानेवारी रोजी नायब तहसीलदार हरी वीर आणि तलाठी यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपोषणकर्त्या महिलांनी आंदोलन सुरूच ठेवले आहे. "प्रशासन व जलसंधारण विभागाने रस्ता कायमस्वरूपी खुला करून दिला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल," असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांचे न्यायासाठी लढा कायम

सोनेवाडी ते पांगरी जाणारा रस्ता तातडीने खुला होईल व दोषींवर योग्य ती कारवाई होईल, अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांची आहे. न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments