चिखलीत ड्राय डेवरही अवैध दारू विक्री ! हॉटेलवर छापा
राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ; ४८५० रुपयांची दारू जप्त
चिखली/( छोटू कांबळे ) – ड्राय डे म्हणजे दारू विक्रीला चक्क बंदीचा दिवस, पण चिखली तालुक्यातील साकेगाव रोडवरील हॉटेल छत्रपतीला मात्र नियमांचं काही घेणं-देणं नसल्याचं उघड झालं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या हॉटेलवर धडक कारवाई करत तब्बल ४,८५० रुपयांची देशी व विदेशी दारू विक्री होत असल्याचा पर्दाफाश केला आहे.
छापा टाकतानाच हॉटेलमध्ये दारू विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी अनिरुद्ध विठोबा टापरे या आरोपीवर महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५ (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तपास अधिकारी एस. के. पाटील आणि आर. एच. सौभागे यांनी नियोजनबद्ध कारवाई करून हॉटेलचा बुरखा फाडला. दि.१ मे २०२५ रोजी ड्राय डेच्या दिवशी असा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. कायदे धाब्यावर बसवून दारू विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची वक्रदृष्टी असल्याचं या कारवाईने दाखवून दिलं आहे. "दारूबंदीचे नियम मोडणाऱ्यांना सोडणार नाही," असा कडक इशारा यानिमित्ताने प्रशासनाने दिला आहे. हॉटेल छत्रपतीवर कारवाई झाल्याने चिखलीतील हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये चर्चा रंगली असून, या प्रकारावर कधी अंकुश लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह उभं आहे.
0 Comments