चिखलीच्या प्रगतिशील नेतृत्वात नवं नाव डॉ. संध्याताई कोठारी नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत पुढे....
समाजकार्य, आरोग्य सेवा आणि जनजागृतीचे अद्वितीय योगदान
“महिलांसाठी प्रेरणा, तरुणांसाठी दिशा, आणि शहरासाठी विकास — संध्याताई कोठारी!”
चिखली/(द बातमीवाला/छोटू कांबळे)-: चिखली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात नवा उत्साह पाहायला मिळत आहे. वैद्यकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत राहिलेल्या डॉ. सौ. संध्याताई विजय कोठारी या आता नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आणि संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. आरोग्य क्षेत्रातील त्यांचा समृद्ध अनुभव, समाजकार्याची जाण आणि महिला सक्षमीकरणासाठी केलेली अखंड धडपड यामुळे त्या चिखलीच्या राजकारणात प्रभावी चेहरा म्हणून उदयास येत आहेत.
डॉ. संध्याताई कोठारी या गेली ३५ ते ४० वर्षे स्त्रीरोग तज्ञ (M.B.B.S., D.G.O.) म्हणून कोठारी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमार्फत रुग्णसेवेत कार्यरत आहेत. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि आधुनिक उपचार पद्धतींमुळे या रुग्णालयाने स्थानिक तसेच ग्रामीण भागातील महिलांना दिलासा दिला आहे. त्याचबरोबर दरवर्षी महिलांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करून त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात सामाजिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे. महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलेसिस सेवा सुरू करून गरजू रुग्णांना दिलासा दिला आहे. ही सेवा चिखलीच्या विद्यमान आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या शुभहस्ते सुरू झाली असून मागील दीड वर्षांपासून सातत्याने रुग्णसेवा दिली जात आहे. गत ९ ते १० वर्षांपासून डॉ. कोठारी या “बेटी बचाव-बेटी पढाओ” अभियानांतर्गत कार्यरत असून, बुलडाणा जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ होण्यासाठी त्यांनी जनजागृतीचे उपक्रम राबवले. मुलगी हा समाजाचा अभिमान आहे, ही भावना रुजवण्यासाठी त्यांनी विविध मार्गदर्शन मेळावे, शाळा-विद्यालयांमध्ये सत्रे व कन्यारत्न झालेल्या माता यांचा सत्कार अशा अनेक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली. या उपक्रमांची शासनानेही दखल घेतली आहे. दहा वर्षांच्या कार्यकाळात डॉ. कोठारी यांनी महिलांमध्ये स्तन कर्करोगाबाबत जनजागृती, तपासणी शिबिरे, श्रमिक महिलांचा सन्मान आणि आरोग्य उपक्रमांची मालिका राबवली. या कार्यामुळे चिखली व परिसरातील महिलांमध्ये आत्मविश्वास आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण झाली.
कोविड काळातील समाजसेवा आदर्शवत
कोविड-१९ महामारीच्या काळात जनतेत निर्माण झालेली भीती दूर करून लसीकरण जनजागृती, मोफत लसीकरण केंद्र तसेच गरजूंना अन्नधान्य किटचे वितरण यांसारखे उपक्रम राबवून त्यांनी मानवतेचा खरा अर्थ दाखवला.
पुरस्कारांनी गौरवलेले कार्य
त्यांच्या कार्याची दखल विविध पातळ्यांवर घेतली गेली आहे. “महाराष्ट्र नारीरत्न २०२०”, “लोकमत आदर्श महिला अचिव्हर्स पुरस्कार २०२१”, “सकाळ आयडल्स ऑफ महाराष्ट्र २०२२”, “सक्षम सहकार-सक्षम महिला” (BEST CHAIRMAN २०२१-२२) आणि “विशेष नारी सन्मान पुरस्कार” या मान्यवर सन्मानांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना डॉ. संध्याताई कोठारी यांचं ध्येय स्पष्ट आहे — “आरोग्यदायी, स्वच्छ आणि प्रगत चिखलीसाठी सक्षम नेतृत्व.” शहरातील आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा, शिक्षण आणि सामाजिक विकास यांसाठी दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून त्यांचा विचार सुरू आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, वैद्यकीय सेवा, समाजकार्य आणि महिला नेतृत्व यांचा संगम असलेल्या डॉ. संध्याताई कोठारी या चिखली नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत प्रभावी आणि जनाधार असलेल्या उमेदवार ठरू शकतात असे बोलल्या जात आहे.


0 Comments