चिखलीत राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे !
शिवसेना (शिंदे गट)–राष्ट्रवादी (अजित पवार गट) युतीची शक्यता ; चिखली नगराध्यक्षपदासाठी भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार
चिखली (द बातमीवाला/ छोटू कांबळे) :- चिखली नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक पक्ष आपापल्या रणनीती आखण्यात गुंतलेला असतानाच, चिखलीतील राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात युतीचे संकेत मिळत असून, ही आघाडी निश्चित झाल्यास चिखलीतील राजकारणात नवे समीकरण तयार होणार आहे.
शिवसेना (शिंदे गट)चे शहराध्यक्ष विलास घोलप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट)चे शहराध्यक्ष तुषार बोंद्रे यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत प्राथमिक सहमती झाल्याचे समजते. त्याचबरोबर नगरसेवक पदाच्या 28 जागांच्या वाटपावरही समाधानकारक चर्चा सुरू आहे.
राजकीय पातळीवर ही युती झाल्यास, चिखली नगरपालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला असून, "नगराध्यक्षपद आमचं, सत्ता भगवीच!" असा नारा सध्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरात ऐकू येतो आहे. दरम्यान, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी मिळून तयार केलेल्या महायुतीत अंतर्गत समन्वयाचा ताण वाढताना दिसत आहे. भाजप एकटा पडल्याची चर्चा असून, शिवसेना व राष्ट्रवादी हातात हात घालून स्वतंत्र पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ पातळीवरून युतीबाबत हिरवा कंदील मिळाल्याचे संकेत आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत चिखलीतील राजकीय वातावरणात मोठी हालचाल होणार असून, स्थानिक पातळीवरील राजकारणात नवा अध्याय सुरू होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

0 Comments