श्रीराम जन्मोत्सवानिमित्त चिखलीत भव्य शोभा यात्रा; तरुणाई श्रीराम गाण्याच्या तालावर थिरकली
ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांचा कडेकोट बंदोबस्त
चिखली (छोटू कांबळे) – चिखली शहरात आज श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून, राम मंदिर येथून निघालेली भव्य शोभा यात्रा लक्षवेधी ठरत आहे. या यात्रेची सुरुवात सकाळी राम मंदिर परिसरातून झाली असून, चिंच परिसरातील जुने गाव थेट येथे ही यात्रा पोहोचली आहे. शोभायात्रा पुढे मार्गक्रम करत आहेत.
शोभायात्रेत राम भक्तांच्या वेशातील बालके, पारंपरिक वाद्यांचे ढोलताशा पथक, टाळ मृदंग, वारकरी महिला पुरुष, विविध सामाजिक-धार्मिक विषयांवर आधारित देखावे, रथयात्रा आणि भगव्या पताकांनी सजलेले रस्ते यामुळे वातावरणात भक्तीमय आणि उत्सवी रंग चढले आहेत.
विशेष म्हणजे, श्रीरामाच्या गाण्यांवर तरुणाई मोठ्या संख्येने डीजेवर थिरकत आहे. "जय श्रीराम", "राम राम जपलं पाहीजे" अशा गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या युवकांचा उत्साह विशेष लक्षवेधी ठरत आहे. तरुणांचे हे रामप्रेम आणि ऊर्जा संपूर्ण शोभायात्रेला एक वेगळीच झळाळी देत आहे.
या उत्सवासाठी पोलिस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. ठाणेदार संग्रामसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी आणि अधिकारी गर्दीच्या नियंत्रणासाठी तैनात असून, संपूर्ण मार्गावर सुरक्षा व्यवस्थेची काटेकोर पाहणी केली जात आहे.
‘द बातमीवाला’च्या प्रतिनिधींनी घटनास्थळी थेट रिपोर्टिंग करत शोभायात्रेतील विविध क्षण टिपले. संपूर्ण चिखली शहर सध्या श्रीराममय झाले असून, रामभक्तांच्या जयघोषाने आणि संगीताच्या तालावर थिरकणाऱ्या तरुणाईने वातावरण भारावून गेले आहे.
0 Comments