एमआयडीसीच्या भूखंडांचे वाटप होणार ; ऑनलाईन निविदा प्रक्रियेला सुरुवात
बुलढाणा /(द बातमीवाला): उद्योग सुरु करायचा म्हटले की जागा कुठे मिळणार हा प्रश्न अनेकांसमोर असतो. परिणामी अनेकांच्या स्टार्टअप्स, उद्योग व व्यवसायांच्या संकल्पना अंमलात येत नाहीत. त्यामुळे उद्योग विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत उद्योग व व्यवसाय सुरु करु इच्छिणाऱ्यांसाठी जिल्ह्यातील विविध सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग भूखंड आणि व्यापारी भूखंडाचे ॲानलाईन निविदा पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे लोणार (लघु) औद्योगिक क्षेत्रात दोन एमएसएमई भूखंड, खामगांव औद्योगिक क्षेत्रात दोन व्यापारी भूखंड, देऊळगाव राजा औद्योगिक क्षेत्रात एक, मलकापूर औद्योगिक क्षेत्रात एक आणि बुलढाणा (लघु) औद्योगिक क्षेत्रात एक व्यापारी भूखंड वाटप करण्यात येणार आहे.
या औद्योगिक क्षेत्रातील वाटपास उपलब्ध असलेले व्यापारी भूखंड" जसे आहे तसे व जेथे आहे तेथे" या तत्वावर वाटप करण्यासाठी शुक्रवार दि २० डिसेंबरपासून शुक्रवार दि. ३ जानेवारी २०२५ सायं. ५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन निविदा मागविण्यात आल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती व अर्ज https://www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.
या भूखंडांच्या संख्येमध्ये व क्षेत्रामध्ये बदल करण्याचे अधिकार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने राखून ठेवले आहेत. निविदा प्रक्रियेचा १५ दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ज्या भूखंडांना "दोन पेक्षा कमी" निविदा प्राप्त होतील. त्या भूखंडांचा कालावधी १५ दिवसांकरीता वाढविण्यात येईल. या निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचणी उद्भवल्यास +९१८४२२९४४०४३ या तांत्रिक संपर्क क्रमांकावर सोमवार ते शुक्रवार ११ ते ५ या वेळेत संपर्क साधावा. तसेच भूखंडाबाबत अधिक माहितीकरीता निविदा कागदपत्रांमधील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील यांनी केले आहे.
0 Comments