"बेवारसतेवर हक्काचे नाते: 250 जणांचा सामूहिक वाढदिवस"

"माणुसकीचा उत्सव : २५० बेवारस बांधवांचा सामूहिक वाढदिवस"

सेवा संकल्प परिवाराचा आगळावेगळा उपक्रम 




चिखली /( छोटू कांबळे ) – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सेवा संकल्प परिवाराने आपल्या 250 पेक्षा अधिक सदस्यांचा सामूहिक वाढदिवस साजरा करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता पळसखेड सपकाळ, तालुका चिखली, जिल्हा बुलढाणा येथे हा विशेष कार्यक्रम होणार आहे.

सेवा संकल्प परिवार हा बेवारस, मनोरुग्ण, तसेच नातेवाईकांचा आधार गमावलेल्या व्यक्तींचा एक मोठा परिवार आहे. इथे भारतभरातून अनेक व्यक्ती येतात आणि आपले जीवन नवीन दिशेने पुढे नेतात. या वाढदिवस सोहळ्याद्वारे 250 बांधव व भगिनींना कुटुंबाचा आधार मिळावा, तसेच त्यांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण निर्माण व्हावा, असा परिवाराचा हेतू आहे. या कार्यक्रमात 250 सदस्यांना भारताचे अधिकृत नागरिकत्व प्रदान करणारी आधार कार्डे व रेशन कार्डे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहेत. यामुळे या बांधवांना त्यांच्या जीवनासाठी गरजेच्या अनेक सुविधा उपलब्ध होतील. कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितांमध्ये संत ह.भ.प. संजयबाबा पाचपोर (अकोला), प.पू. आचार्य वेरुळकर गुरुजी (नांदुरा), बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्यामजी चांडक, आमदार श्वेताताई महाले, आमदार संजय गायकवाड, आमदार मनोज कांयदे, तसेच जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांचा समावेश असेल. सेवा संकल्प परिवाराने या कार्यक्रमासाठी समाजातील सर्व स्तरांतील लोकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. "आपल्या उपस्थितीने या बांधवांच्या कपाळावरील बेवारसपणाचा शिक्का पुसा व त्यांना हक्काचे कुटुंब मिळवून द्या," असे साद घालत सर्वांना या आनंद सोहळ्याचा भाग होण्यासाठी निमंत्रण मी समस्त माऊली सेवा संकल्प परिवार यांनी दिले आहे.

Post a Comment

0 Comments