चिखली शहर काँग्रेसला मोठा धक्का !

निलेश अंजनकर यांनी दिला चिखली शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा ; भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) सोबत जाणार ?



चिखली /( छोटू कांबळे) : चिखली शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष निलेश अंजनकर यांनी वैयक्तिक कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून शहरातील पक्षाच्या संघटनात्मक मजबुतीला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या राजीनाम्यात अंजनकर यांनी नम्रपणे आपल्याला दिलेल्या सन्मानाबद्दल काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. अतहर काझी यांचे आभार मानले आहेत. "माझ्या वैयक्तिक कारणांमुळे मी या पदाचा राजीनामा देत आहे. आपण मला दिलेला हा सन्मान मी नेहमीच स्मरणात ठेवेन. कृपया माझा राजीनामा स्वीकृत करावा," असे अंजनकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.                                               निलेश अंजनकर हे चिखलीतील काँग्रेस पक्षाचे मजबूत नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता आणि त्यांचे संघटन कौशल्य हे काँग्रेसच्या यशाचा एक महत्त्वाचा भाग मानले जात होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर आता शहरातील काँग्रेसचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.

 भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याची शक्यता !

अंजनकर यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून ते भाजप किंवा शिवसेना (शिंदे गट) सोबत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अंजनकर ज्या पक्षात जातील त्या पक्षात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा त्या पक्षाला फायदा होईल.

पुढील राजकीय समीकरणे

निलेश अंजनकर यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्यास चिखली शहरातील राजकीय समीकरणे बदलू शकतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल भाजप व शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेससाठी कसा महत्त्वाचा ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अंजनकर यांची प्रतिक्रिया प्रतीक्षेत

निलेश अंजनकर यांनी त्यांच्या पुढील राजकीय निर्णयाबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या राजीनाम्याने चिखली शहरातील राजकीय वातावरण तापले असून आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

0 Comments