दवा आणि दुवासाठी एकटवली माणुसकी !

कॅन्सरग्रस्त महिलेला लोकसहभागातून सात हजारांची आर्थिक मदत



चिखली ( द बातमीवाला ): अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगणाऱ्या आणि कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त असलेल्या श्रीमती पारूबाई भानुदास अवचार या निराधार महिलेला समाजातून मोठा आधार मिळाला आहे. उपचारासाठी आर्थिक अडचण भासत असल्याने सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार छोटू कांबळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन केले. 

कांबळे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी पुढाकार घेतला आणि लोकसहभागातून सात हजार रुपये फोन पेच्या माध्यमातून जमा झाले. ही रक्कम छोटू कांबळे यांनी पारूबाई यांना सुपूर्त केली. या मदतीमुळे उपचारासाठी काही प्रमाणात आधार मिळाला असून समाजातील माणुसकीचे दर्शन घडले आहे. नारायण भोलवणकर,रुपेश बोचरे, अमित इंगळे तसेच पारूबाईंचे नातेवाईक आणि शेजारील मंडळी या प्रसंगी उपस्थित होती. लोकसहभागातून मिळालेल्या मदतीमुळे पारूबाई यांना आता उपचारासाठी थोडा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या पुढील उपचारांसाठी अधिक मदतीची गरज असल्याने अजूनही समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दवा आणि दुवा दोन्ही मिळत असल्याने समाजात माणुसकीचे दर्शन घडत आहे, हे या प्रसंगाने सिद्ध केले आहे.

Post a Comment

0 Comments