दोन दिवसातून होते बेपत्ता , अखेर मृतदेहच आढळला ! परिसरात खळबळ

हत्या की अपघात ? – शवविच्छेदन अहवालानंतरच होणार खुलासा



सिंदखेडराजा ( द बातमीवाला ) – तालुक्यातील साखरखेर्डा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या मौजे राताळी गावठाण शिवारात एका बेपत्ता इसमाचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत इसमाचे नाव नारायण भावराव मैंद (वय ५०, रा. येवता, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे असून ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते.

आज शनिवारी (दि. ५ एप्रिल) सकाळी राताळी गावातील ट्रान्सफॉर्मर जवळ मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच साखरखेर्डा पोलीस ठाण्याचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून श्वान पथक आणि अन्य तपास यंत्रणांना पाचारण केले.

नारायण मैंद हे दोन दिवसांपासून गायब असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली होती. मात्र ते मिळून न आल्याने चिंता वाढली होती. अखेर त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे त्यांच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा प्रकार हत्या आहे की विजेच्या शॉर्टसर्किटचा अपघात, याबाबत निश्चित माहिती मिळालेली नसून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथे पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, पोलीस तपास सुरु असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Post a Comment

0 Comments