पाचव्या मजल्यावरून उडी मारण्याच्या प्रयत्नातील युवकास जीवदान ; कपिल खेडेकर यांनी आत्महत्येपासून रोखले
चिखल/(द बातमीवाला ) : चिखली येथील एका खासगी रुग्णालयाच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला शिवसेनेचे नेते कपिल खेडेकर यांनी प्रसंगावधान राखत प्राण वाचविले. १६ जूनच्या दुपारी ही घटना घडली.
मुलाच्या उपचारासंदर्भातील कौटुंबिक कलहामुळे आलेल्या नैराश्यातून या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर कपिल खेडेकर यांनी उपचारानंतर रुग्णांना तत्काळ डिस्चार्ज देण्याची आणि योजनेअंतर्गत बिलांसाठी नातेवाइकांना वेठीस न धरण्याची विनंती डॉक्टरांकडे केली. कपिल खेडेकर हे त्यांच्या पत्नीची आरोग्य तपासणी करण्यासाठी चिखलीतील एका खासगी रुग्णालयात गेले. तेथे गेल्यावर रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरून 'मी उडी मारतोय, मी आत्महत्या करतोय' असा ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी तत्काळ वर पाहिले असता एक तरुण टेरेसच्या कठड्यावर उभा राहून आत्महत्येची धमकी देत असल्याचे निदर्शनास आले. खेडेकर यांनी तत्काळ त्या तरुणाला खालूनच विनंती केली की 'असे करू नको, तुझे म्हणणे काय आहे ते सांग'. सुमारे दहा ते पंधरा मिनिटे समजूत काढल्यानंतर तो तरुण खाली येण्यास तयार झाला. त्यानंतर खेडेकर यांनी टेरेसवर जाऊन त्याला थांबवले आणि त्याची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने सांगितले की त्याचा लहान मुलगा रुग्णालयात अॅडमिट होता. त्याच्यावरील उपचार पूर्ण झाले होते. डॉक्टर्स योजनेअंतर्गत उपचार करत असल्याने बिल अजून जमा झाले नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी त्याला आणखी एक दिवस थांबण्यास सांगितले होते. परंतु त्याला आपल्या पत्नी आणि मुलाला तत्काळ घरी घेऊन जायचे होते. यासोबतच त्याचे कौटुंबिक वाद सुरू होते. सासू आणि पत्नीसोबतचे संबंध बिघडल्याने तो तीव्र तणावात होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्येचा विचार केला होता.
तरुणाने मानले कपिल खेडेकर यांचे आभार, जीवन वाचवणारा देवदूत ठरला
"तुमच्यामुळे माझे आयुष्य वाचले," अशा शब्दांत त्या तरुणाने कपिल खेडेकर यांचे आभार मानले.आर्थिक अडचणी व कौटुंबिक तणावामुळे आत्महत्येसाठी टेरेसवर चढलेल्या तरुणाला खेडेकर यांनी प्रसंगावधान राखून रोखले. त्यांच्या धीराने संवाद साधण्याच्या प्रयत्नांमुळे त्या तरुणाला जीवनाकडे पुन्हा सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याची प्रेरणा मिळाली. तरुणाच्या कुटुंबीयांनीही खेडेकर यांचे आभार मानले आणि त्यांच्या त्वरित मदतीमुळे मोठा अनर्थ टळल्याचे सांगितले. "अशा कठीण प्रसंगी कपिल खेडेकर सारख्या व्यक्तींचा आधार मिळाल्याने माझ्या आयुष्याला नवा आशय मिळाला," असे तरुणाने सांगितले.
0 Comments