Accident : तरुणांची नशा आणि वेगाची स्पर्धा; रस्ते बनले मृत्यूचे रणांगण !

तरुणांमध्ये वाढते व्यसनधीनतेचे संकट ; रस्त्यावर जीवघेण्या अपघातांची मालिका

तणाव, बेरोजगारी आणि चुकीची संगत तरुणांना ओढते नशेकडे



चिखली/(छोटू कांबळे )- सध्या  तरुणांमध्ये व्यसनधीनतेचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, मद्यपानानंतर वाहन चालवण्याच्या घटनांनी चिंताजनक वळण घेतले आहे. या बेदरकार सवयींमुळे रस्त्यांवर जीवघेण्या अपघातांची मालिका सुरू असून, यात अनेक तरुणांना अकाली प्राण गमवावे लागत आहेत, तर काही जण कायमचे अपंगत्व घेऊन जगण्यास मजबूर झाले आहेत.

अलीकडेच शहरात घडलेल्या दोन गंभीर अपघातांत मद्यधुंद अवस्थेत बाईक चालवणाऱ्या तरुणांचा मृत्यू झाला. काही ठिकाणी नशेतले स्टंट करताना वाहन अनियंत्रित होऊन पादचाऱ्यांचा बळी घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अपघातग्रस्तांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनांनी पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. मानसोपचारतज्ज्ञांच्या मते, चुकीची संगत, ताणतणाव, बेरोजगारी आणि सोशल मीडियावर दिसणारा आभासी थरार हे तरुणांमध्ये व्यसनाकडे ओढण्याचे प्रमुख घटक आहेत. “वेळीच संवाद, मार्गदर्शन आणि कठोर कायदेशीर अंमलबजावणी न झाल्यास ही समस्या अधिक बळावू शकते,” असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. पोलीस प्रशासनाने मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर विशेष मोहिमा राबवत कठोर कारवाई सुरू केली आहे. “नशा ही थराराची मजा नाही, ती मृत्यूचे आमंत्रण आहे,” असा इशारा देत नागरिकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळावेत, असे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले आहे.




Post a Comment

0 Comments