तब्बल ३० जणांना घेतला चावा ; गंभीर ९ रुग्णांना बुलढाणा केले रेफर
नगरपालिका ॲक्शन मोडवर, कुत्र्याला पकडण्यासाठी विशेष टीम रवाना !
चिखली/(द बातमीवाला) :- चिखली शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा कहर सुरू असून, त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज दि. १२ डिसेंबर रोजी चिखलीतील आठवडी बाजार, तहसील कार्यालय परिसर आणि राऊतवाडी परिसरात या कुत्र्याने तब्बल ३० नागरिकांना चावा घेतला. या घटनेमुळे शहरभर चिंता आणि खळबळ माजली आहे. स्थानिक सामान्य रुग्णालयात पिडीत रुग्णांवर उपचार सुरू असून, आठ ते नऊ रुग्णांना गंभीर अवस्थेत असल्यामुळे त्यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे. चिखलीमध्ये या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे घबराट निर्माण झाली आहे आणि नागरिकांचा मानसिक दबाव वाढला आहे. चिखली नगरपालिकेचे मुख्य अधिकारी प्रशांत बिडगर यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ ॲक्शन मोडवर येत कुत्र्याला पकडण्यासाठी विशेष टीम तयार केली आहे. या टीमला संबंधित परिसरात रवाना करण्यात आले असून, नगरपालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या पिसाळलेल्या कुत्र्याचा पत्ता लागल्यास तात्काळ नगरपालिकेला कळवावे. चिखलीतील नागरिकांनीही आपले सुरक्षिततेचे उपाय सुचवले असून, प्रशासनाच्या मदतीने लवकरात लवकर या पिसाळलेल्या कुत्र्याला पकडून या संकटावर नियंत्रण मिळवण्याचे आवाहन केले आहे.
(पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी नगरपालिकेचे ठिकठिकाणी दक्ष झाल्या टीम )
0 Comments