"लाडक्या बहिणींच्या" नजरा लागल्या डिसेंबरच्या हफ्त्याकडे !

"लाडक्या बहिणींना" आता डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा!

योजनेचे निकष बदलणार असल्याने लाडक्या बहिणीमध्ये चिंता 




बुलढाणा/(छोटु कांबळे) : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कालावधीत १५०० रुपयांचा हप्ता थांबला होता, पण आता निवडणुका संपल्या असून, हप्ता बँक खात्यात जमा होणार का? याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी, पुढील हप्त्याच्या वितरणात काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे बहिणींमध्ये चिंता वाढली आहे.
  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य पुरविणे होता, परंतु योजनेच्या अटी कडक करण्याची आवश्यकता सरकारला जाणवली आहे. आतापर्यंत, एका कुटुंबात दोन महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचे निकष असतानाही कधी कधी त्या कुटुंबातील अधिक महिलांना फायदा दिला गेला. तसेच, आयकर भरणारे आणि चारचाकी वाहन असलेल्या कुटुंबांना योजनेचा लाभ मिळू नये अशी अट असतानाही, अशा कुटुंबांच्या महिलांना हप्ता दिला गेला होता.
योजनेसाठी लागणारा खर्च सरकारला परवडत नसल्याने, योजनेच्या निकषांमध्ये बदल करण्याची तयारी दिसत आहे. आता उत्पन्नाच्या कडक अटी लागू होऊ शकतात. यापूर्वी या योजनेला काही कुटुंबांमध्ये अपात्र लाभार्थी देखील मिळाले होते. जर अशी अटी लागू झाली तर योजनेच्या लाभार्थींची संख्या कमी होईल. याशिवाय, विधवा, निराधार आणि इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार का, या चर्चांमुळे लाडक्या बहिणींच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. त्याच वेळी, निवडणुकीच्या प्रचारात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यात वाढीची घोषणा करण्यात आली होती. १५०० रुपयांवरून आता २१०० रुपये दिले जाणार असल्याची माहिती महायुतीने दिली होती. त्यामुळे बहिणींच्या मनात आता २१०० रुपयांच्या हप्त्याची आशा निर्माण झाली आहे. यामुळे लाडकी बहीण योजनेसाठीच्या निकषांवर चर्चेला अधिक वाव मिळाला आहे. ग्रामीण भागात अशी चर्चा आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पहिल्या कॅबिनेट बैठकीत या निर्णयाची घोषणा केली, तर त्याचा फायदा लाडक्या बहिणींना मिळेल.

१५०० की २१०० रुपयांचा हप्ता ? बहिणींची उत्सुकता कायम !                            
महाराष्ट्रात युतीचे सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेतील हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन महायुतीने दिले होते. आता महायुतीचे सरकार अस्तित्वात आल्याने, लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये होणार का, यावर चर्चा सुरू आहे. हा धोरणात्मक निर्णय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अटींवर चर्चा सुरू : नवीन निकषांमुळे लाभार्थींची संख्या होऊ शकते कमी !
लाडकी बहीण योजनेच्या अटींवर सध्या चर्चा सुरू आहे. लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो का? कुटुंबात चारचाकी वाहन आहे का? एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत का? महिला विधवा, निराधार किंवा इतर सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत का? अशा निकषांवर आधारित लाडकी बहीण योजनेची पात्रता तपासली जाऊ शकते. जर हे निकष लागू झाले, तर जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या कमी होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments