परभणी हिंसाचार आणि गृहमंत्र्याच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात 'जेल भरो' सत्याग्रह
चिखली /( द बातमीवाला)- चिखली तालुक्यातील आंबेडकरी समाज बांधवांनी आज १९ डिसेंबर रोजी जयस्तंभ चौकात सामूहिक सत्याग्रह आंदोलन आयोजित केले. यावेळी सम्राट अशोक-फुले-शाहू-आंबेडकर वाटिकेत शहीद सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन सभा पार पडली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी 'जेल भरो' सत्याग्रह जन आंदोलन केले.
चिखली पोलिसांनी या आंदोलनात सहभागी असलेल्या सर्व आंबेडकरी समाज बांधवांना स्थानबद्ध केले, तरीही त्यांनी आपल्या मागण्या तशाच कायम ठेवल्या. आंदोलनकर्त्यांनी गृहमंत्री अमित शहांच्या वादग्रस्त विधानाचा तीव्र निषेध केला. अमित शहा यांनी लोकसभेत आंबेडकरांबद्दल केलेले "आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर, ये बोलना अब फॅशन हो गया" हे विधान समाज बांधवांनी दुर्बलतेचे आणि आंबेडकरांचा अवमान करणारे ठरवले. यावरून गृहमंत्र्याच्या माफीची मागणी करण्यात आली.
आंदोलनात आंबेडकरी समाजाने परभणी जिल्ह्यातील हिंसाचार, खोटी गुन्हे आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासंबंधी सरकारला मागणी केली . आंदोलनकर्त्यांनी सरकारला शहीद सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची तसेच दोषी पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर करून, दोषींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी, "शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला शासनाने पुनर्वसन दिले नाही, तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या अपमानकारक विधानाबद्दल माफी मागावी" असे ठामपणे सांगितले. आंदोलनकर्त्यांनी, "जर सरकारने या मागण्या मान्य न केल्यास, विधानसभा अधिवेशनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढण्यात येईल" असा इशारा दिला.
या निवेदनावर भाई प्रदीप अंभोरे, संजय वाकोडे, भाई छोटू कांबळे, प्रशांत डोंगरदिवे, मधुकर मिसाळ, सिद्धार्थ पैठने, अर्जुन बोर्डे, दीपक कस्तुरे, मनोज जाधव, भारत जोगदंडे, भीमराव खरात, हिम्मतराव जाधव, प्रकाश बनकर, प्रशांत भटकर,दीपक साळवे, संघमित्रा कस्तुरे, मंदाबाई आराख, रेखा चव्हाण, हिम्मतराव जाधव, राजेंद्र सुरडकर यांच्यासह अनेक समाज बांधवांच्या स्वाक्ष-या असून, त्यांच्या एकजूटाने आंबेडकरी समाजाचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे सूचित केले.
0 Comments