संजय गाडेकर आणि सरपंच किरण गाडेकर भाजपच्या वाटेवर ?
चिखली / ( छोटू कांबळे): बुलडाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस संजय माणिकराव गाडेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे. दिनांक 21 जानेवारी रोजी गाडेकर यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
भाजप नेत्यांची सदिच्छा भेट आणि राजकीय हालचाली
संजय गाडेकर यांच्या बुलढाण्यातील निवासस्थानी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव विद्याधर महाले यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीत गाडेकर यांनी महाले दाम्पत्यांचे स्वागत व सत्कार केला. बैठकीत राजकीय विषयांवर चर्चा झाल्याचे समजते, त्यामुळे गाडेकर लवकरच भाजपप्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
आदर्श गाव तेल्हारा सरपंचांचाही भाजपप्रवेश ?
संजय गाडेकर यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि आदर्श गाव तेल्हारा गावच्या सरपंच किरणताई संजय गाडेकर यांच्या भाजपप्रवेशाचीही चर्चा आहे. जर ही चर्चा खरी ठरली, तर गाडेकर कुटुंबाचा भाजपप्रवेश बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का ठरेल.
संजय गाडेकर : कणखर आणि प्रभावी नेतृत्व
संजय गाडेकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिखली तालुक्यातील मजबूत नेते म्हणून ओळखले जातात. 2012 मध्ये त्यांनी चिखली तालुका अध्यक्षपद सांभाळत असताना 3 जिल्हा परिषद सर्कल आणि 4 पंचायत समिती सदस्य निवडून आणले होते. त्याशिवाय, त्यांनी बाजार समिती संचालक आणि खरेदी-विक्री संघटनेची महत्त्वाची पदे भूषविली आहेत. संस्कृत, निर्माणशील आणि दमदार नेतृत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. संजय गाडेकर आणि किरणताई गाडेकर यांच्या भाजपप्रवेशावर अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी त्यांच्या हालचालींमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आता सर्वांचे लक्ष गाडेकर यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.
भविष्यातील राजकीय समीकरणे
संजय गाडेकर यांच्या भाजपप्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलू शकतात. चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपची पकड अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसला नव्याने नेतृत्व उभे करावे लागेल.
0 Comments