अखेर..काल राजीनामे देणारे आज झाले भाजपवाले !!

राष्ट्रवादीचे संजय गाडेकर, काँग्रेसचे निलेश अजंनकर व किशोर सोळंकी यांचा भाजपमध्ये प्रवेश



मुंबई / ( छोटू कांबळे ): राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असताना २२ जानेवारी हा दिवस भाजपसाठी प्रवेशदिन ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस संजय गाडेकर, त्यांच्या पत्नी व सरपंच सौ. किरणताई गाडेकर, काँग्रेसचे चिखली तालुका कार्याध्यक्ष निलेश अजंनकर, काँग्रेस युवक अध्यक्ष किशोर सोळंकी, शिवदास राजपुत यांच्यासह अनेकांनी आज दि. २२ जानेवारी रोजी मुंबई येथे अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.

हा पक्ष प्रवेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. यावेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नवीन सदस्यांचे स्वागत केले आणि आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी संघटनात्मक बळ वाढल्याचे मत व्यक्त केले.

प्रवेशकर्त्यांना  योग्य सन्मान व समान संधी मिळेल - आ. श्वेताताई महाले


            आज भारतीय  जनता पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्व नव्या सहकाऱ्यांचे मी पक्षात मनःपूर्वक स्वागत करते. यातील प्रत्येक जण हा राजकीय व सामाजिक क्षेत्रात व्यापक अनुभव व जनसंपर्क असलेला कार्यकर्ता आहे याची मला जाणीव आहे. प्रत्येकाला येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्षात योग्य तो सन्मान व आपल्यातील कार्यक्षमता दाखवण्याची समान संधी निश्चित मिळेल व यातून भाजपाचा चिखली मतदारसंघात पाया अधिक विस्तारेल अशा शब्दात आ. श्वेताताई महाले यांनी या पक्षप्रवेशाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

२१ जानेवारी ठरला राजीनामा दिन

या नेत्यांनी काल, २१ जानेवारी रोजी आपापल्या पक्षांतील पदांचा राजीनामा देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवेशामुळे स्थानिक आणि प्रादेशिक राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. राजकीय निरीक्षकांच्या मते, या प्रवेशामुळे भाजपचा पश्चिम विदर्भातील प्रभाव आणखी वाढणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसला स्थानिक पातळीवर मोठा फटका बसू शकतो.

Post a Comment

0 Comments