चिखलीत मोटारसायकल सवार चोरट्यांकडून सव्वा तोळ्याची सोनसाखळी चोरी
चिखली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध केला गुन्हा दाखल
चिखली / ( द बातमीवाला ) –: चिखली शहरातील पोहरकर हॉस्पिटलसमोर काल दि. 16 जानेवारी रोजी सायंकाळी अंदाजे 7:30 वाजता धक्कादायक सोनसाखळी चोरीची घटना घडली. त्रिवेणी अनंता शेळके (वय 42 वर्षे), या शिक्षिकेच्या गळ्यातील अंदाजे सव्वा तोळ्याची सोन्याची साखळी चोरीला गेली.
त्रिवेणी शेळके यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या त्यांच्या स्कुटी (MH 28 BD 5575) वरून जयस्तंभ चौकातील बोंद्रे पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरून पुंडलीक नगर येथील घरी जात होत्या. पोहरकर हॉस्पिटलसमोर सिध्दसायन्स चौकाकडून येणाऱ्या एका मोटारसायकलवर दोन अनोळखी इसम आले आणि त्यांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावली.चोरीची घटना इतक्या झटक्यात घडली की त्रिवेणी यांना काही कळायच्या आत चोरटे मोटारसायकलने खामगाव चौफुलीच्या दिशेने पळून गेले. त्यांनी गाडी थांबवून मदतीसाठी आरडाओरड केली, मात्र तोपर्यंत चोरटे फरार झाले होते. घटनास्थळी त्यांनी त्यांच्या गळ्यातील साखळीचा तुटलेला सव्वा तोळ्याचा एक भाग आढळून आला. उर्वरित साखळी, ज्याची अंदाजे किंमत ₹60,000 आहे, चोरट्यांनी लंपास केली. त्रिवेणी शेळके यांनी तत्काळ चिखली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. चिखली पोलीस ठाण्यात या घटनेत भारतीय दंड संहितेच्या कलम 304(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे.
पोलिसांचे तपास सुरु
सदर चोरीचा तपास सुरू असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तसेच प्रत्यक्षदर्शींची मदत घेतली जात आहे.चिखली शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
0 Comments