चिखली पोलिसांची चपळ कारवाई, गुन्हेगार गजाआड !

केळवद येथील घरफोडी प्रकरण : चिखली पोलिसांची जलद कार्यवाही, 24 तासांत आरोपी गजाआड !

₹2.72 लाखांचे सोन्याचे दागिने परत, पोलिसांची तत्परता सिद्ध



चिखली/( छोटू कांबळे ): चिखली तालुक्यातील केळवद येथे झालेल्या घरफोडी प्रकरणात चिखली पोलिसांनी केवळ 24 तासांत प्रभावी तपास करून दोन आरोपींना अटक केली आहे. चोरीस गेलेल्या 36 ग्रॅम 80 मिली वजनाच्या सोन्याचे दागिने, ज्याची एकूण किंमत ₹2,72,500 इतकी आहे, ते हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, बाबुराव पाटील (वय 57), रा. केळवद, ता. चिखली, हे आपल्या कुटुंबासोबत दिनांक 07 मार्च 2025 रोजी लाखनवाडा येथे गेले होते. रात्री 10 वाजता घरी परतल्यावर त्यांनी आपल्या घराचे कुलूप तुटलेले पाहिले. आत तपासणी करताना बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले व तिजोरी उघडलेली आढळली. तिजोरीतील सोन्याची चेन, अंगठ्या, ओम, आणि इतर दागिने गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी 09 मार्च रोजी चिखली पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. चोरी झालेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹2,72,500 इतकी असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

डि.बी. पथकाची जलद कार्यवाही...

पोलीस निरीक्षक संग्रामसिंह पाटील यांनी डि.बी. पथकाला गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी सोपवली. पथकातील सफौ राजेंद्र काळे, निलेश सावळे, अजय इटावा यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी सुरज प्रमोद मोरे हा अण्णाभाऊ साठे चौकात येणार असल्याचे समजले. पोलिसांनी त्वरित सापळा रचून सुरज मोरे याला ताब्यात घेतले. सुरजकडून विचारपूस करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली व आपल्या साथीदार विजय महादू गवईचा पत्ता सांगितला. पोलिसांनी विजय गवईलाही ताब्यात घेतले. दोन्ही आरोपींनी चोरीचे सर्व दागिने पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलीस अधिकाऱ्यांचे नेतृत्व व टीमवर्क...

सदर गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या नेतृत्वाखाली डि.बी. पथकातील समाधान वडने, राजेंद्र काळे, निलेश सावळे, अजय इटावा, राहुल पायघन, प्रशांत धंदर, पंढरीनाथ मिसाळ, सागर कोल्हे आणि महिला पोलीस रुपाली उगले यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि जलद कारवाई केली.

नागरिकांकडून कौतुक :

पोलिसांच्या तात्काळ व प्रभावी कारवाईमुळे चोरी गेलेला मुद्देमाल मालकाला परत मिळाला असून, नागरिकांनी पोलीस विभागाच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या जलद तपासामुळे चिखली पोलिसांचा जनतेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.


Post a Comment

0 Comments