चिखली भुमीअभिलेख कार्यालय दलालांच्या ताब्यात ?
पैसे दिले तरच कामे, अन्यथा महिन्यांचा विलंब ; नागरिकांचा आरोप
भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी व दलालांवर गदा आणा - सागर पुरोहित यांचे निवेदन
चिखली (छोटू कांबळे /द बातमीवाला) – चिखली तालुका भुमीअभिलेख कार्यालय हे नागरिकांच्या सेवेसाठी आहे की दलालांच्या कमाईसाठी, असा सवाल आता शहरासह तालुक्यातील जनतेतून मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कारण, शेताची मोजणी, पीआर कार्ड काढणे आणि इतर भुमीअभिलेख संबंधित कामांसाठी अर्ज केल्यास थेट दलालांच्या मार्फत पैशांची मागणी केली जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
पैसे न दिल्यास मोजणीला सहा सहा महिने लांबवणे, कामात हेतुपुरस्सर अडथळे निर्माण करणे, तर पैसे दिल्यास दुसऱ्याच दिवशी कामे पूर्ण करणे, असा ‘नियम’ येथे राबवला जात असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. परिणामी, हे कार्यालय अधिकारी आणि कर्मचारी चालवत आहेत की दलाल, असा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप चिखली शहराध्यक्ष सागर पुरोहित यांनी ९ ऑगस्ट रोजी महसूल मंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देत भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी आणि दलालांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची मागणी केली. तसेच चिखली भुमीअभिलेख कार्यालयात प्रामाणिक, सक्षम आणि कार्यतत्पर उपअधीक्षकाची नियुक्ती करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी ठाम भूमिका पुरोहित यांनी घेतली. या निवेदनामुळे आता तालुक्यातील शेतकरी व नागरिकांच्या अपेक्षा महसूल मंत्रालयाकडे लागल्या असून, खरोखरच कारवाई होईल का की भ्रष्टाचाराचा गाडा तसाच सुरू राहील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments