BREAKING : शहरातील नागरिकांनाही घरकूल !

प्रधानमंत्री आवास योजना २.० ; ऑनलाईन नोंदणीची सुविधा



बुलडाणा, (जिमाका) : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना शहरी २.० या महत्त्वाकांक्षी योजनेच्या माध्यमातून शहरी भागातील गरजू नागरिकांना घरकुल देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत नवीन घरकुल मंजुरीसाठी शहरी भागातील पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली असून इच्छुकांनी जवळील सीएससी सेंटरवर ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. जिल्ह्यातील शहरी नागरिकांना याद्वारे आव्हान करण्यात येते की प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नवीन घरकुल मंजुरीकरीता https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx हे वेबपोर्टल सुरु करण्यात आले आहे. इच्छुक लाभार्थ्यांना या वेबपोर्टलच्या माध्यमातून सी.एस.सी. सेंटरवर ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. 


पात्रता : प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० अंतर्गत नवीन घरकुलासाठी पात्रता निश्चित करण्यात आली असून त्यानुसार लाभार्थी तसेच कुटुंबामधील इतर सदस्यांच्या नावे देशाच्या कोणत्याही भागात पक्के घर नसावे. लाभार्थ्याने गेल्या २० वर्षात कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वार्षिक उत्पन्न मर्यादा ४.५ लक्ष रुपये कमाल राहील.  



ही कागदपत्रे आवश्यक : नवीन घरकुल नोंदणी ऑनलाईन करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. त्यानुसार अर्जदार यांचे मोबाईल नंबर लिंक असलेले आधारकार्ड, तहसिल कार्यालयातील उत्पन्नाचे चालु वर्षाचे प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, आधार लिंक असलेले बँकेचे पासबुक, जमिनीचे पुरावे जसे (सातबारा, आखिव पत्रिका, शासकीय जागेचा पट्टा, मालमत्ता पत्रक, टॅक्स असेसमेंट नक्कल  चालु ३ महिन्यातील), खरेदीखत, अर्जदार यांचे आई व वडीलांचे आधारकार्ड(हयात नसल्यास मुत्यु प्रमाणपत्र), अर्जदार यांचे कुटूंबामधील सर्व सदस्यांचे आधारकार्ड (पती/पत्नी व मुले) , पी.एम. स्वनिधी, इमारत बांधकाम कामगार, पी.एम विश्वकर्मा इ. योजनेचा लाभार्थी असल्यास नोंदणी प्रत, चालु वर्षाची नगर परिषद कर भरल्याची पावती, रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. नोंदणीबाबत लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास नगर परिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षाची मदत घ्यावी आणि ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची संचिका नगरपरिषद कार्यालयात सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले आहे. 


Post a Comment

0 Comments