"Bogus Awards" : "खरे कार्य शून्य, खोटे गौरव शंभर"

 "पैसे देऊन पुरस्कार जिंकणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांचा धुमाकूळ"

"सामाजिक काम नाही, तरीही पुरस्कार :   "समाजसेवेचा आव आणणाऱ्या डिजिटल नेत्यांचा 'पेड अवॉर्ड्स'चा खेळ"



बुलढाणा /(द बातमीवाला ) : आजच्या काळात समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेत्यांना मागे टाकत  स्वयंघोषित नेत्यांनी पुरस्कारांचा बाजार मांडला आहे. दगडाखाली नेते वाढलेत, पण या दगडाखालील स्वयंघोषित नेत्यांनी पुरस्कारांच्या माध्यमातून स्वतःची पाठ थोपटण्याचा नवीन ट्रेंड सुरू केला आहे. वास्तविक, ना त्यांनी समाजसेवेसाठी कुठली महत्त्वाची कामगिरी बजावली, ना त्यांनी कुठल्या सामाजिक प्रश्नांवर ग्राउंड लेव्हलवर लढा दिला. मात्र सोशल मीडियावरच्या पोस्ट्सच्या आधारे ते स्वतःला समाजसेवक म्हणवून घेत आहेत.

सोशल मीडिया या स्वयंघोषित नेत्यांचा मंच बनला आहे. समाजाला दिशा देण्याऐवजी, त्यांनी हा मंच स्वतःच्या जाहिरातीसाठी दूषित केला जात आहे. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर पोस्ट टाकून लोकांच्या डोळ्यात धूळफेक करणाऱ्या या 'डिजिटल नेत्यांनी' आता पुरस्कार मिळविण्यासाठी नवीन मार्ग शोधले आहेत.

पैसे देऊन पुरस्कार मिळविण्याचा 'ट्रेंड'

कुठल्याही सामान्य संस्थेकडून पैसे भरून किंवा ओळखीच्या आधारावर पुरस्कार मिळवण्याचा मोठा प्रकार सुरू झाला आहे. बोगस संस्थांच्या नावाखाली बनावट पुरस्कार वाटपाचे प्रमाण वाढले आहे. या पुरस्कारांमध्ये कसलेही मोजमाप नसते, फक्त आर्थिक देवाणघेवाण होते. त्यामुळे खऱ्या समाजसेवकांवर अन्याय होत असून, समाजात खोटी उदाहरणे निर्माण होत आहेत.

समाजाच्या भावनांशी खेळ

हे स्वयंघोषित नेते समाजासाठी खोट्या पोस्ट्स, खोटे कार्य टाकून आणि दिखाऊ कार्यक्रमांची जाहिरात करून लोकांची दिशाभूल करत आहेत. खरं तर, समाजसेवेचा फक्त आव आणून पुरस्कारांचा बाजार मांडणाऱ्या या नेत्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे गरजेचे आहे.

खरे समाजसेवक कुठे आहेत ?

खऱ्या नेत्यांनी समाजसेवेचा खरा अर्थ सांगावा आणि या खोट्या पुरस्कारांच्या खेळाचा पर्दाफाश करावा, अशी जनतेची मागणी आहे. समाजाच्या भल्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांना पुढे आणणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे. हे सर्व पाहता, सध्या समाजसेवेचा चेहरा असलेले खरे नेते शोधणे आणि या दिखाऊ नेत्यांचा पर्दाफाश करणे, हाच समाजाच्या प्रगतीचा खरा मार्ग आहे.

Post a Comment

0 Comments