"News Impact" : बातमीचा जबरदस्त इम्पॅक्ट – शहरात स्वच्छतेचा धडाका सुरू !

 

बातमीचा प्रभाव ! ‘द बातमीवाला’वरील वृत्तामुळे प्रशासन जागे  ; मुख्याधिकारी बिडगर यांची तातडीने कारवाई

काम झेपत नसेल तर मोकळे व्हा!’ – ठेकेदारांना बिडगर यांचा खडसावणारा इशारा




चिखली (द बातमीवाला/छोटू कांबळे)चिखली नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाल्यांतील दुर्गंधीयुक्त घाण व केरकचरा उचलण्यात येत असला तरी, त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून अळ्यांचा व डासांचा त्रास वाढला आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याची माहिती ‘द बातमीवाला’ वेब पोर्टलवर प्रसिद्ध झाल्यानंतर, संबंधित प्रशासन हालचालीत आले आहे.

या वृत्ताची चिखली नगर पालिका कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी तात्काळ दखल घेतली असून, संबंधित ठेकेदारांना चांगलाच इशारा दिला आहे. बिडगर यांनी स्पष्ट शब्दांत ठेकेदारांना सुनावत म्हटले की, "शहरात ज्या ज्या भागात घाण व केरकचरा आहे तिथे तातडीने साफसफाई करून सर्व कचरा ट्रॅक्टरद्वारे उचलावा. शहरात कायमस्वरूपी स्वच्छता राखावी, अन्यथा तक्रारी आल्यास गाठ माझ्याशी आहे."        त्यांनी पुढे स्पष्ट केले की, "काम झेपत नसेल तर मोकळे व्हा!" असा थेट इशारा देत, नोटीस देखील बजावणार आहे. कामाच्या गुणवत्ता आणि नियमिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, हे अधोरेखित केले.



नागरिकांमध्ये समाधान

मुख्याधिकाऱ्यांच्या त्वरित कृतीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासनाने वेळेवर दखल घेतल्याबद्दल आभार व्यक्त होत आहेत. शहरातील स्वच्छतेबाबत ठोस पावले उचलली जात असल्याने भविष्यात डास, अळ्या आणि आजारांचा धोका कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

‘द बातमीवाला’ वरील बातमीचा हा प्रभाव म्हणजे पत्रकारितेची ताकद अधोरेखित करणारा ठोस उदाहरण ठरला आहे.


Post a Comment

0 Comments