"Municipal Council" : स्वच्छतेचा बोजवारा – चिखलीकरांचे आरोग्य रामभरोसे !

चिखली नगर पालिकेतील स्वच्छतेकडे दुर्लक्ष – नागरिक त्रस्त, आरोग्य धोक्यात

 मुख्यधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर ; ठेकेदार आणि सुपरवायझर कामचुकार

कोटींचे टेंडर घेणारा साफसफाई ठेकेदारांचा ढिसाळ कारभार; नागरिकांचे आरोग्य धोक्यात



चिखली (द बातमीवाला/ छोटू कांबळे) – चिखली नगर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून नाल्यांतील दुर्गंधीयुक्त घाण व केरकचरा उचलण्यात येत नसल्याने या प्रक्रियेमुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत असून, अळ्या व डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य गंभीर संकटात सापडले आहे.

या गंभीर समस्येवर नागरिक वेळोवेळी तक्रारी करीत असले तरी संबंधित विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले असून, लोकांच्या आवाजाला ‘केराची टोपली’ दाखवली जात आहे. विशेष म्हणजे, साफसफाईसाठी ठेकेदारांकडून कोटी रुपयांचे टेंडर घेतले जात असतानाही प्रत्यक्षात नाल्यांची, सार्वजनिक जागांची व रस्त्यांची योग्य सफाई होत नसल्याचे चित्र आहे.    या साफसफाईच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, त्यामुळे डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीच्या आजारांचा धोका वाढला आहे. नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.               मुख्यधिकारी श्री. बिडगर यांनी स्वच्छतेसंदर्भात संबंधित विभागाला व ठेकेदारांना वेळोवेळी कडक सूचना दिल्या आहेत. मात्र तरीही सुपरवायझर आणि ठेकेदार आपले कर्तव्य पार पाडण्यात अपयशी ठरत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांकडून आता अपेक्षा व्यक्त होत आहे की, बिडगर साहेब या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतील आणि दोषी ठेकेदारांवर कठोर कारवाई करून शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावतील.


Post a Comment

0 Comments