Railway Route : खामगाव–जालना रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी दिला ठाम विश्वास !

रेल्वे लोक आंदोलन समिती सोबत ना. जाधव व आ. श्वेताताई महाले यांनी रेल्वेमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिले निवेदन...



चिखली/(द बातमीवाला ) - बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरचा भाग चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, लोणार व मेहकर हे तालुके गेल्या अनेक दशकांपासून रेल्वे सुविधेपासून वंचित राहिले आहेत. या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा खामगाव–जालना रेल्वे मार्ग सुरू व्हावा, ही मागणी इंग्रजांच्या काळापासून सुरू आहे. त्या काळात या मार्गाचा सर्वेक्षण अहवाल तयार झाला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र आजवर रखडलेलीच राहिली.        मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर या ऐतिहासिक मागणीला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे. राज्य सरकारने या रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे ठोस हमी दिली असून, त्यामुळे खामगाव–जालना रेल्वे मार्गाला खऱ्या अर्थाने “अच्छे दिन” येण्याची आशा निर्माण झाली आहे. आता राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकारनेही या प्रकल्पासाठी स्पष्ट व ठाम भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी व्यक्त केली आहे.

या संदर्भात आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी विधानसभेत हा महत्त्वाचा प्रश्न ठामपणे मांडत खामगाव–जालना रेल्वे मार्गाचे भौगोलिक, आर्थिक व सामाजिक महत्त्व सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील भागाच्या विकासासाठी रेल्वे कनेक्टिव्हिटी किती आवश्यक आहे, तसेच या मार्गाचा ऐतिहासिक संदर्भ काय आहे, हे त्यांनी सविस्तरपणे मांडले. राज्य सरकारच्या माध्यमातून प्रस्ताव पुढे नेऊन हा रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, आज या मागणीला प्रत्यक्ष गती देण्यासाठी आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्यासह रेल्वे लोक आंदोलन समिती, चिखलीच्या सदस्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री नामदार श्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन खामगाव–जालना रेल्वे मार्ग तातडीने सुरू करण्याबाबत निवेदन दिले. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे खासदार नामदार श्री प्रतापरावजी जाधव तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे खाजगी सचिव श्री विद्याधरजी महाले उपस्थित होते. त्याचप्रमाणे रेल्वे लोक आंदोलन समितीचे श्री किशोर वळसे, श्री रेणुकादास मुळे, श्री आशुतोष गुप्ता, श्री अनिस भाई व श्री गोपाल तुपकर यांची या प्रसंगी उपस्थिती होती.                                                   आमदार श्वेताताई महाले पाटील यांची विकासाबाबतची तळमळ त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून स्पष्टपणे दिसून येते. रस्ते, रेल्वे, पाणी, शिक्षण व इतर मूलभूत सुविधांसाठी त्या सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत असून, खामगाव–जालना रेल्वे मार्गासाठी उचललेले हे पाऊल बुलढाणा जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड ठरेल, अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments