चिखलीत राजकीय रणधुमाळी ! नगराध्यक्षपदासाठी विलास घोलप आघाडीवर ; भगवा फडकावण्याचा निर्धार
शहराध्यक्ष विलास घोलप यांच्या जोरदार तयारीला वेग – प्रभागागणिक जनसंवाद, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; युती, आघाडी मोडली तर चिखलीत चुरशीची लढत ठरणार ?
चिखली /(द बातमीवाला/वार्तापत्र)- महायुतीतली सत्तासंतुलनाची गणितं आता चिखली नगरपालिकेच्या राजकारणात तापू लागली आहेत. नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (शिंदे गट) चे शहराध्यक्ष विलास घोलप यांनी जोरदार तयारी सुरू केली असून, शहरातील व्यापारी, दुकानदार, नागरिक आणि स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क मोहीम सुरू केली आहे. चिखली नगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, बुलढाण्याचे आमदार व शिवसेना बुलढाणा जिल्हा संपर्कप्रमुख संजय गायकवाड यांनी नुकत्याच घेतलेल्या इच्छुक उमेदवारांच्या आढावा बैठकीत स्फोटक वक्तव्य करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे. “बुलढाणा नगराध्यक्ष पदाची जागा भाजपला सोडतो, पण चिखली नगराध्यक्ष पदाची जागा चिखली शिवसेनेलाच द्या,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले. या वक्तव्यानंतर महायुतीत नवीन चर्चांना आणि तणावाला उधाण आले आहे. शिवसेना आता नगराध्यक्ष पदासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाली असून, विलास घोलप यांनी प्रत्येक प्रभागात जनसंवाद आणि नेत्यांशी बैठकांचा धडाका लावला आहे. शहरात सध्या “घोलप विरुद्ध इतर पक्ष” अशी चर्चा रंगली आहे. राजकीय समीकरणे पाहता, जर स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती किंवा आघाडीची सांगड बसली नाही, तर सर्व पक्ष आमने-सामने येऊन चुरशीची लढत होणार यात शंका नाही. चिखली नगरपालिकेच्या या रणांगणात सध्या वातावरण तापले असून, आगामी दिवसांत महायुतीतली सीटवाटप चर्चा आणि घोलप यांचा पुढील डाव या दोन्हींकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


0 Comments