वाढीव वीजबिलांनी नागरिक संतप्त, जबरदस्तीने बदलेल्या जात आहे मिटर...
भानखेड/(सोनु गायकवाड) - एरवी मिटर बदलायचे असल्यास नगदी पैसे भरपूर घेणारी वीजविरण कंपनी आता नवीन मिटर ग्राहकांना नको असलेले स्मार्ट मिटर जबरदस्तीने बसवत असल्याचा प्रकार चिखली तालुक्यातील भानखेड येथे घडत असल्याचे उघडकीस आला आहे.
फॉल्टी मीटर असल्याचे कारण पुढे करत मोठ्या प्रमाणात नवीन स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. मात्र या स्मार्ट मीटरमुळे वीजबिलांमध्ये अचानक प्रचंड वाढ झाल्याने नागरिकांना जबर आर्थिक धक्का बसला असून संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांच्या मते, अनेक ठिकाणी मीटर पूर्णपणे सुरळीत असतानाही कनिष्ठ अभियंता व वायरमन यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आणि नागरिकांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने स्मार्ट मीटर बसवले. मीटर बदलल्यानंतर अवघ्या काही दिवसांत हजारो रुपयांची वीजबिले येऊ लागल्याने सामान्य ग्राहक हवालदिल झाला आहे.
विशेष म्हणजे वाढीव वीजबिले भरण्यास असमर्थ असलेल्या ग्राहकांची थेट वीज तोडणी केली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. “बिल भरा नाहीतर वीज कापू” अशी धमकी देत नागरिकांवर दबाव टाकला जात असल्याने महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.
भानखेडमधील नागरिकांनी स्मार्ट मीटरच्या अचूकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या मीटरमुळेच अव्वाच्या सव्वा बिले येत असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार भूमिकेमुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून वाढीव वीजबिले रद्द करावीत, नागरिकांची वीज तोडणी थांबवावी आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.या संदर्भात गावकरी महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देणार असून वेळप्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

0 Comments