"गोपाल यंगडच्या फसवणुकीच्या विरोधात डेमोक्रॅटिक पार्टी आक्रमक"

"बुलढाणा तहसील कार्यालयासमोर ३ मार्चला डफडे आंदोलनाची तयारी"

 "जातप्रमाणपत्रासाठी युवकाची फसवणूक ; डफडे बजाओ आंदोलनाचा इशारा"




बुलढाणा / ( द बातमीवाला ) : डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी बुलढाणाने  गोपाल जयवंता यंगड याच्यावर आर्थिक फसवणूक व धमकी प्रकरणी कारवाई न केल्यास बुलढाणा तहसील कार्यालयासमोर ३ मार्च २०२५ रोजी 'डफडे बजाओ' आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लखन रमेश कांबळे या युवकाने जातप्रमाणपत्र मिळवण्यासाठी गोपाल यंगड याला सप्टेंबर २०२४ मध्ये ६,००० रुपये दिले होते. मात्र, तयार प्रमाणपत्रावर त्रुटी असल्याचे सांगून गोपाल यंगड याने पुन्हा प्रमाणपत्र तयार करण्याच्या नावाखाली ८,००० रुपये घेतले. परंतु, नव्याने मिळालेल्या प्रमाणपत्रात कोणताही फरक नसल्याचे आढळून आले.  लखन कांबळे यांनी अधिक रक्कम परत मागितली असता, गोपाल यंगड याने अश्लील भाषेत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याचे आरोप आहेत. या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व तहसीलदार कार्यालयात करण्यात आली. मात्र, अद्याप कारवाई न झाल्याने युवक आघाडीने नाराजी व्यक्त केली आहे. डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता भाई छोटू कांबळे यांच्या नेतृत्वाखाली दि. ३ मार्च २०२५ रोजी तहसील कार्यालय, बुलढाणा येथे डफडे बजाओ आंदोलन होणार आहे. वेळ दुपारी ११:३० वाजता कार्यकर्ते व समाजबांधव एकत्र येऊन आवाज उठवणार असल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. दिलेल्या निवेदनावर अँड. गुणवंत नाटेकर साहेब, भाई छोटू कांबळे, दिलीप काळे, विकास अवसरमोल , दीपक अवसरमोल, स्वप्निल जाधव, अर्जुन गवई, सागर खरात, अनिल घोडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

यांनाही दिल्या प्रतिलिपी...

गोपाल यंगड याच्या विरोधात कठोर कारवाई न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी,  पोलीस अधीक्षक , तहसील कार्यालय व पोलीस निरीक्षक यांना देण्यात आली आहे.शासनाने या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष घालून संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाच्या युवक आघाडीने केली आहे. 



Post a Comment

0 Comments