Petrol टाकून जाळल्या दुचाक्या !

अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दुचाक्या जाळल्या ; पळसखेड सपकाळ येथे भीतीचे वातावरण



चिखली /( गोपाल वाळेकर ) :- चिखली तालुक्यातील पळसखेड सपकाळ येथे रविवारी रात्री दोन वाजताच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून दोन दुचाकींना आग लावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळालेल्या दुचाकींपैकी एक संकेत ज्ञानेश्वर सपकाळ यांची हिरो स्प्लेंडर प्लस (क्रमांक MH28 BL2625) असून दुसरी राधेश्याम देवराव काळे यांची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रमांक MH28 X3094) आहे. या घटनेमुळे दोन्ही दुचाक्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

गाडी मालकांनी नेहमीप्रमाणे दुचाकी घराबाहेर उभ्या केल्या होत्या. मात्र, रात्री दोनच्या सुमारास शेजारी राहणाऱ्या महिलेने दुचाकी जळताना पाहिल्या. त्यांनी तत्काळ आरडाओरड करत मालकांना माहिती दिली. गाडी मालकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.  घटनेची तक्रार अमडापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकारामुळे पळसखेड सपकाळ परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्रीची गस्त वाढवण्याची विनंती केली आहे. तसेच, ग्रामपंचायत प्रशासनाने गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी जोर धरत आहे.   या घटनेने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून पोलीस प्रशासनाने तातडीने या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करण्याची गरज आहे.

Post a Comment

0 Comments