"Petition" : "घुले सरांची बदली रद्द करा अन्यथा शाळा सोडू – पालकांचा इशारा"

चिखलीच्या श्री शिवाजी अभ्यास शाळेतील घुले सरांची तडकाफडकी बदली ; पालक वर्ग नाराज, पुन्हा नियुक्तीची मागणी

"गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या घुले सरांची बदली; पालकांचे निवेदन सचिवांना"



चिखली /(छोटू कांबळे) : श्री शिवाजी अभ्यास शाळा, चिखली येथील आदर्श शिक्षक श्री डिंगाबर परसराम घुले सर यांची तडकाफडकी बदली केल्याने पालक वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या निर्णयाच्या विरोधात पालकांनी आज दिनांक 19 जुलै रोजी एक संयुक्त निवेदन श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावतीचे सचिव यांना दिले आहे. हे निवेदन शाळेचे प्राचार्य श्री घायाळ सर यांच्या मार्फत सुपूर्द करण्यात आले.

निवेदनात पालकांनी नमूद केले आहे की, घुले सर हे विद्यार्थ्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि आवडते शिक्षक असून त्यांची अध्यापन पद्धती सोपी, सरळ आणि प्रभावी आहे. त्यांनी दिलेले शिक्षण हे गुणवत्तापूर्ण असून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. अशा शिक्षकाची तडकाफडकी बदली ही अन्यायकारक असल्याची भावना पालकांनी व्यक्त केली. श्री. घुले सरांची बदली दिनांक 17 जुलै रोजी करण्यात आली असून त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी असलेली आपुलकी आणि विश्वास लक्षात घेता, त्यांना पुन्हा चिखली शाळेतच नियुक्त करण्यात यावे, अशी जोरदार मागणी पालकांनी केली आहे. निवेदनाच्या शेवटी पालकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, "घुले सर यांना तात्काळ पुन्हा रुजू न केल्यास आमच्या पाल्यांचे शाळा सोडण्याचे दाखले द्यावेत," अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणाकडे शिक्षण संस्थेने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments