डासाळा ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीविरोधात महिलांचा बेमुदत उपोषणाचा एल्गार
बेकायदेशीर ठराव रद्द करण्यासाठी महिलांचे ठाम आंदोलन
चिखली/( छोटू कांबळे ) : चिखली तालुक्यातील उदयनगरजवळ असलेल्या डासाळा ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात महिलांनी आज, ८ एप्रिल रोजी दुपारी १२.०० वाजेपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ग्रामपंचायतीने २६ मार्च २०२५ रोजी घेतलेली ग्रामसभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ती रद्द करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे.
उपोषणकर्त्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार, डासाळा येथील गट क्र. १७७ मधील जमीन, जी १९९० पूर्वीपासून मागासवर्गीय व इतर ११ लोकांच्या ताब्यात आहे, त्यावर अतिक्रमण असल्याचा ठपका ग्रामपंचायतीने ठेवला आहे. या संदर्भात ग्रामपंचायतीने कोणतीही पूर्वसूचना न देता आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जाहीरनाम्यातील नियमांचे उल्लंघन करून २६ मार्च २०२५ रोजी ग्रामसभा आयोजित केली.
महिलांचा आरोप आहे की, ही ग्रामसभा गावात दवंडी फिरवून ग्रामपंचायत कार्यालयासमोर न घेता बेकायदेशीरपणे हनुमान मंदिरात घेण्यात आली. सरपंच, सचिव, तलाठी आणि कृषी अधिकारी यांच्या संगनमताने ही बेकायदेशीर सभा पार पडली आणि त्यात जमिनीसंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.
उपोषणकर्त्या महिला डासाळा गावच्या रहिवासी असून त्या मागासवर्गीय व गरीब अतिक्रमणधारक आहेत. त्या १९९० पूर्वीपासून या जमिनीवर आपली उपजीविका करत आहेत. १ डिसेंबर रोजी तहसीलदारांनी याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध केला होता, ज्याला त्यांनी विरोध केला होता आणि त्यावेळी ग्रामपंचायतीने कोणताही ठराव घेतला नव्हता. त्यानंतर, जिल्हाधिकाऱ्यांनी २६ मार्च २०२५ रोजी पुन्हा जाहीरनामा प्रसिद्ध करून हरकती मागविल्या. या विरोधात ११ लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी हरकत घेतली असताना, ग्रामपंचायतीने गावात दवंडी फिरवून ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयासमोर होणार असल्याचे सांगितले.
मात्र, प्रत्यक्षात ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयासमोर न घेता हनुमान मंदिरात घेण्यात आली. ज्यांनी हरकती दाखल केल्या होत्या, त्यांना मंदिरात बोलावून त्यांच्या सह्या घेण्यात आल्या. या ग्रामसभेला कधीही न येणाऱ्या स्त्री-पुरुषांना बोलावून सनद बेलाकार यांच्या अध्यक्षतेखाली बेकायदेशीरपणे कामकाज सुरू करण्यात आले आणि जाहीरनाम्यानुसार टाळ्या वाजवून ठराव मंजूर करण्यात आला. अतिक्रमणधारकांनी या ठरावाला विरोध दर्शविला होता आणि लेखी हरकत दिली असतानाही त्यांची कोणतीही दखल न घेता हा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला, असा आरोप महिलांनी केला आहे.
या सर्व प्रकाराची तातडीने चौकशी व्हावी, बेकायदेशीर ग्रामसभा आणि त्यातील ठराव रद्द करण्यात यावा आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असलेल्या जमीनपट्ट्याच्या प्रकरणावर निर्णय होईपर्यंत डासाळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर नव्याने फेरग्रामसभा घेण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्त्या महिलांनी केली आहे. या मागणीचे निवेदन यापूर्वी ग्रामपंचायतीला देण्यात आले होते, परंतु कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आजपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणात शिवाजी नामदेव आराख, संगीता नारायण घोडे, सखुबाई रमेश धुरंदर, बेबाबाई शालिकराम वानखडे, देवकाबाई गंगाराम नाडे, कांताबाई किसन गायकवाड आणि मंगलाबाई आराख या महिला सहभागी झाल्या आहेत.
0 Comments