Jay Shivray : चिखली शहरात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा !

आ. सौ. श्वेताताई महाले यांच्याकडून पुतळा सौंदर्यकरणासाठी 50 लक्ष रुपयाचा निधी




चिखली/(छोटू कांबळे ) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य असा अश्वारूढ पुतळा चिखली शहरात लवकरच उभारला जाणार असून सध्या शहराच्या मध्यवर्ती असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेवर हा नवीन पुतळा उभारला जाणार आहे. 

त्याकरिता सध्या असलेला पुतळा काढण्याच्या कार्यवाहीला उद्या बुधवार दि. २५ जुलै रोजी सुरुवात होत आहे. तहसीलदार, नगरपालिका मुख्याधिकारी, चिखली पोलीस स्टेशनचे ठाणेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता तसेच शहरातील सर्व महत्त्वाचे राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या कार्यवाहीला उद्या सकाळी ११ वाजता प्रारंभ होत आहे. 
 छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये १९८५ मध्ये शिवरायांचा पूर्णाकृती पुतळा नगरपालिकेद्वारे स्थापन करण्यात आला होता. त्याच जागेवर महाराजांचा भव्य असा नवीन अश्वारूढ पुतळा स्थापन केला जात आहे. या नवीन अश्वारूढ पुतळ्याची उंची १५ फूट असून वजन सुमारे २२०० ते २३०० किलोग्राम एवढे असणार आहे. हा पुतळा पूर्णपणे ब्राँझ धातूचा असणार असून याची निर्मिती करह: स्टुडिओ पुणे येथील प्रसिद्ध शिल्पकार ललित धनवे जे इटलीतील प्रसिद्ध शिल्पकला कंपनी एफएए यांच्या सोबत काम करतात त्यांच्या  सहाय्याने शिल्पकार श्री प्रसाद मोडक यांनी केली आहे. व या शिल्पावरील चित्रकला चित्रकार सौ. कविता देशमुख यांनी चित्रित केली आहे. या संबंधातील सर्व प्रशासकीय मान्यता प्राप्त करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता.




आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या विशेष आस्थेचा विषय असल्याने आणि चिखली शहराच्या सौंदर्यात भर घालेल आणि मानात वाढ करेल असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा शिवप्रेमी चिखलीकरांचा विशेष आग्रह असल्याने आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी राज्य शासनाकडून सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून तर आणल्याच या प्रस्तावित पुतळ्यासाठी पन्नास लक्ष रुपयाचा निधी सुद्धा खेचून आणून चिखलीतील सर्व शिवप्रेमींच्या स्वप्नाला एक हळुवार फुंकर घातली आहे.  आता सर्व प्रशासकीय मान्यता राज्य शासनाद्वारे देण्यात आल्या असून जिल्हास्तरीय पुतळा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी याबाबत नगरपालिकेला दि. ६ मे रोजी पाठवलेल्या पत्राद्वारे सूचित केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रानंतर पुतळा हलवण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केल्या असून सध्या असलेला पुतळा सुरक्षितपणे काढून पुतळ्याच्या खाली असलेल्या चौथऱ्याचे नव्याने बांधकाम केले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना या जागेवर करण्यात येईल. त्या दृष्टीने बुधवारी सकाळी ११ वाजता पुतळा हलवण्याच्या कार्यवाहीला सुरुवात होत आहे. १९८५ पासून अस्तित्वात असलेल्या या जुन्या पुतळ्याचे स्थानांतरण करण्यापूर्वी या पुतळ्याचा विधिवत दुग्ध अभिषेक करून, त्याची पूजा करून हा पुतळा हलवला जाणार आहे. पुतळा हलवण्याची कार्यवाही सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जुन्या पुतळ्याचा अभिषेक व पूजा करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे भाजपा शहराध्यक्ष श्री सागर पुरोहित यांनी सबंध शिवप्रेमींना आग्रहाचे निमंत्रण दिले आहे. आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सूचनेनुसार तहसीलदार संतोष काकडे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, पोलीस ठाण्याचे ठाणेदार संग्राम पाटील आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता दीपक चिंचोले या शासकीय अधिकाऱ्यांसह शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत ही कार्यवाही होणार असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments