अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार : राहुल बोंद्रे
परवानगी संदर्भातील दिरंगाईबद्दल राज्य सरकारला प्रतित्रापत्र सादर करण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश
चिखली/(छोटू कांबळे) : - अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयाला ए. आय. सी. टी. ई. ने तीन महिन्यापासून संगणक शाखेच्या वाढीव ६० जागेला परवानगी दिली होती. मात्र तरीही त्यावर राज्य शासनाने परवानगीचा जीआर काढला नव्हता. याप्रकरणी नागपूर खंडपीठाने कडक निर्देश दिल्यानंतर तीन महिन्यापासून थांबलेली परवानगी राज्य शासनाने दोन तासाच्या आत दिली. मात्र परवानगी दिल्यानंतरही राज्य शासनामागील कोर्टाचा ससेमीरा थांबता थांबेना. 2 जुलै रोजीच्या नागपूर खंडपीठात झालेल्या सुनावणीच्या निकाल पत्रामध्ये कोर्टाने अनेक गंभीर ताशेरे राज्य शासनावर ओढले आहेत. राज्य सरकाचे अधिकारी ‘एआयसीटीई’ पेक्षा वरचढ आहेत का ? असा सवाल करत अधिकाऱ्यांनी मनमानी पद्धतीने आपले अधिकार वापरणे अयोग्य असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदविले. अनुराधा अभियांत्रिकीची प्रवेशासाठीची परवानगी थांबविणे ही गंभीर बाब असुन झालेल्या दिरंगाई बाबत स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र एका आठवड्यात सादर करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्याचे मुख्य सचिव तथा संचालक यांना दिले आहेत. ही त्यांना न्यायालयातून मिळणारी शेवटची संधी असल्याचे देखील न्यायालयाने निकालात स्पष्ट केले आहे. तर नागपूर खंडपीठाचा हा निर्णय एक दिशादर्शक निकाल असून अनेक बाबतीत तो ऐतिहासिक ठरणारा आहे. अनुराधा अभियांत्रिकी प्रकरण राज्य शासनाला महागात पडणार असल्याचे श्री परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी सांगितले.
अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयाला ए. आय. सी. टी. ई. ने तीन महिन्यापासून परवानगी दिली होती. मात्र शासनाकडून जाणीवपूर्वक त्रास देण्याचा हेतूने त्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नव्हता. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात श्री परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेद्वारा राज्य सरकार विरोधात याचिका क्र. 3371/2025 दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर २ जुलै रोजी झालेल्या सुनावित न्यायलयाने पुन्हा एकदा राज्य सरकारला फटकारले आहे. सरकारी अधिकाऱ्यांना अनुराधा अभियंत्रिकी महाविद्यालयाला प्रवेशासाठी उपलब्ध महाविद्यालयांच्या यादीत समाविष्ट का केले नाही याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही, विशेषतः जेव्हा ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनने १० एप्रिल २०२५ रोजी मान्यता दिलेली आहे. तेव्हा राज्य अधिकारी AICTE पेक्षा वरचढ असल्यासारखे का वागत आहेत ? असा सवाल उपस्थित करुन न्यायालयाने सरकारी अधिकाऱ्यांच्या वागणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच न्यायालयाने शेवटचा संधी म्हणून, राज्याचे प्रधान/अतिरिक्त मुख्य सचिव तसेच उच्च व तंत्र शिक्षण संचालक यांनी या गंभीर त्रुटीचे स्पष्टीकरण देणारे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहे.
नागपूर उच्च न्यायालयाने अशा प्रकारे सरकारला फटकारले
१)अधिकारी आपली सत्ता मनमानी पद्धतीने वापरत होते.
२) ए आय सी टी ई दिल्ली पेक्षा आपण वरचढ आहोत अशी भावना अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली दिसून येते.
३) विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेण्याचा हा प्रयत्न होता.
४) अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाईचा इशारा दिल्यानंतरच अनुराधा अभियांत्रिकीचा जीआर शासनाने काढला.
५) प्रवेशा संदर्भातला जीआर जरी काढला असला तरी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण सचिव तथा संचालक मुंबई यांनी जीआर काढण्यासाठी उशीर का झाला याचे समाधानकारक उत्तर शपथपत्रावर एक आठवड्याच्या आत देण्यासाठी शेवटची संधी न्यायालयाने त्यांना दिली.
अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हिशोबाने कायदा वाकवताय यावर शिक्कामोर्तब : राहुल बोंद्रे
सरकारी अधिकारी आपले अधिकार हे कायद्याच्या तरतुदीनुसार न वापरता सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले बाहुले झाल्यासारखे वापरत आहेत. हे खुद्द नागपूर उच्च न्यायलायायाने अधोरेखित केले. विनाकारण विरोधी पक्षाच्या नेत्यांना त्रास देऊन त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून पक्षप्रवेशाचे दडपण आणल्या जात आहे. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हिशोबाने कायदा वाकवताय यावर न्यायलयाच्या निकालाने शिकामोर्तब झाले आहे. सरकारच्या आरेरावीवर व अधिकाऱ्यांच्या हुजरेगिरीवर आळा घालणारा हा एक दिशादर्शक व ऐतिहासिक निकाल असल्याची प्रतिक्रिया श्री परमहंस रामकृष्ण मौनीबाबा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी सांगितले. सत्य परेशान हो सकता है, लेकिन पराजित नही, याची न्यायालयाच्या निकालवरुन प्रचिती आली. दमदाटीच्या हुकुमशाहीच्या राजकारणाला कधी बळी पडलो नाही आणि यापुढेही शोषित वंचित, शेतकरी कष्टकरी वर्गांसाठी लोकशाही मार्गाने लढत राहणार असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. नागपूर खंडपीठाचा आजचा निर्णय एक दिशादर्शक निकाल असून अनेक बाबतीत तो ऐतिहासिक ठरणारा आहे.
0 Comments