महायुतीत असतानाही शिंदे गटाच्या आमदाराची गर्जना ; सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा बिगुल
चिखली /(छोटू कांबळे )- बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीचे समीकरण ढवळून काढणारा स्पष्ट संदेश रविवारी आज (१० ऑगस्ट) चिखलीत उमटला. चिखली येथील मौनीबाबा संस्थान येथे बुलढाणा विधानसभेचे आमदार धर्मवीर संजयजी गायकवाड यांच्या संकल्पनेतून व युवा नेते मृत्युंजय गायकवाड यांच्या पुढाकारातून भव्य जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला.
हा मेळावा बुलढाणा जिल्हा संघटक म्हणून संजय गायकवाड यांची नियुक्तीनंतर चिखलीतला पहिला मोठा जल्लोष ठरला. यावेळी आमदारांनी थेट आदेशाच्या स्वरात गर्जना केली — “चिखली नगराध्यक्षपद शिवसेनेचं, बाकी चर्चा नंतर !” तसेच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही शिवसेना सदस्य निवडून आणण्याची जबाबदारी स्वीकारली. बैठकीत त्यांनी पक्ष संघटन बळकट करणे, गावागावात व वाडा-वार्डापर्यंत शाखा स्थापन करणे, जुन्या काळातील शिवसेना पुन्हा उभी करणे, शासनाच्या योजना थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करणे आणि बुलढाण्याच्या धर्तीवर चिखलीचा विकास करणे, या विषयांवर मार्गदर्शन केले. “काही गावे बुलढाण्याशी जुळलेली असून, तेथील लोक मला आपल्या मतदारसंघात घेण्याची विनंती करतात. पण मीच त्यांच्या दारी जातो,” असे त्यांनी हसत सांगितले. या वेळी मंचावर मृत्युंजय गायकवाड, विजय अंभोरे, सौ. अनुजाताई साळवे, संदीप गायकवाड, धनंजय बारोटे, कपिल खेडेकर, विलास घोलप, रोहित खेडेकर, अर्जुन नेमाडे, बाळू वराडे, राजू पाटील, विनोद वनारे, मदन राजे गायकवाड यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. या मेळाव्यानंतर चिखलीतील भाजप-शिवसेना समीकरणांवर नवा तडाखा बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांचे रणांगण आता तापणार हे निश्चित आहे.
0 Comments