“ही केवळ पिकाची नव्हे, तर आयुष्याची हानी” — डॉ. ज्योतीताई खेडेकर
दगडांनी व्यापलेली जमीन आणि उरलेले फक्त ओलसर सोयाबीनचे ढिगारे — हे दृश्य पाहून ज्योतीताईंच्या डोळ्यांतही पाणी
पांढरदेव /(छोटू कांबळे/द बातमीवाला) - रक्षाबंधनाच्या दिवशी पांढरदेव भोरस -भोरशी, मंगरूळ नवघरे शिवारात ढगफुटीने थैमान घातले. अवघ्या काही तासांच्या पावसात शेतकऱ्यांचे 60 ते 70 टक्क्यांपर्यंत पीक पाण्याखाली गेले. या पावसाच्या तडाख्यात बांधावरील दगड सुद्धा शेतात शिरले, ज्यामुळे पिकासोबतच मातीची धूप होऊन जमीनही उद्ध्वस्त झाली.
या आधीच शेतकरी सलग संकटांनी त्रस्त होते. हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक नष्ट झाले होते. काहींनी कर्ज काढून परत पेरणी केली होती, मात्र अवकाळी पावसाने त्यावरही पाणी फेरले. आता झालेल्या ढगफुटीने मोठ्या प्रमाणावर सोयाबीनचे नुकसान होऊन कुटुंबाचा उदरनिर्वाहच धोक्यात आला आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) नेत्या डॉ. ज्योतीताई खेडेकर यांनी शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली. पाण्याखाली गेलेली पिके, दगडांनी व्यापलेली जमीन आणि उरलेले फक्त ओलसर सोयाबीनचे ढिगारे — हे दृश्य पाहून ताईंच्या डोळ्यांतही पाणी आले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या वेदना ऐकून घेतल्या आणि तात्काळ तहसीलदारांकडे नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
“हा केवळ पिकाचा नाही, तर शेतकऱ्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. शासनाने तातडीने मदत केली नाही, तर पुढच्या हंगामात ही शेती ओसाड पडेल,” असा इशारा त्यांनी दिला.
शेतकऱ्यांच्या मते, या नुकसानीमुळे येणाऱ्या हंगामात बियाणे, खत, कर्जफेड यासाठी मोठे संकट ओढवणार आहे.
“आधी हुमणी अळी, मग अवकाळी पाऊस, आणि आता ढगफुटी… या पिकाच्या नशिबात तर फक्त नाशच आहे का ?” असा हताश सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
रक्षाबंधनाच्या दिवशी, आनंदाऐवजी अश्रूंनी डोळे भरलेले असलेल्या शेतकऱ्यांची ही वेदनादायी कहाणी, शासनाने तातडीने लक्ष घालून मदत करण्याची मागणी करत आहे.
0 Comments