"लोकशाही वाचवा"च्या हाकेतून मशालींचा महासागर ; चिखलीत काँग्रेसचा मोर्चा दणाणला
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला शेकडो नागरिकांचा मशाल मोर्चा
चिखली/(द बातमीवाला): भारतीय जनता पक्षाने मतदार याद्यांमध्ये घोटाळे करून मतचोरी केल्याच्या आरोपांवर काँग्रेसकडून जोरदार निषेध नोंदविण्यात आला. स्वतंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला गुरुवारी चिखली शहरात तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चात शेकडो नागरिकांनी हातात मशाली आणि निषेध फलक घेऊन “मतदान चोर, खुर्ची सोड” अशा घोषणांनी शहरभर दणाणून सोडले. मोर्चाची सुरुवात जयस्तंभ चौकातून झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, बसस्टँड मार्गे पुन्हा जयस्तंभ चौकातील फुले-आंबेडकर वाटिकेत मोर्चाचा समारोप करण्यात आला. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांसह विविध सहयोगी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्व वयोगटातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष लक्षवेधी ठरला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलीकडेच पत्रकार परिषदेत मतदार याद्यांमधील घोटाळ्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या मते, भाजपने निवडणूक आयोगावर दबाव टाकून, मतदार यादीत छेडछाड करून आणि गैरमार्गाने सत्ता मिळवली आहे. या पार्श्वभूमीवर देशभर काँग्रेसकडून निषेध मोर्चे काढले जात आहेत.
“लोकशाहीवर थेट आघात” – राहुल बोंद्रे
या मोर्चात बोलताना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले, “अलीकडील निवडणुकांत भाजपने मतदार याद्यांमध्ये फेरफार करून नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित केले. ही फसवणूक लोकशाही आणि संविधानावर थेट आघात आहे. मतचोरी हा केवळ राजकीय विषय नसून प्रत्येक मतदाराचा अपमान आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, काँग्रेस पक्षाने या लढ्याला देशभरात न्याय मिळेपर्यंत चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
चिखली मतदारसंघ भाजपच्या घोटाळ्यात सामील ?
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मदतीने भारतीय जनता पक्षाने (भाजपा) मतदार यादीत छेडछाड करून 'मत चोरी' केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यानंतर महाविकास आघाडीनेही (मविआ) राज्यातील मतदार यादीत छेडछाड झाल्याचा दावा केला आहे. विधानसभा निवडणूकीत भाजपने मतचोरी केलेल्या १३ मतदारसंघात चिखली मतदारसंघ असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. चिखली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी संपूर्ण निवडणूक काळात सातत्याने निवणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, हे विशेष... ! या मोर्चात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ जाधव, शहराध्यक्ष राहुल सवडतकर, डॉ. मोहमंद इसरार, दीपकभाऊ देशमाने, प्रा. निलेश गावंडे, प्रा. राजू गवई, युवक काँग्रेसचे रिकी काकडे, तसेच विविध सेल्सचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निषेधाचा आवाज बुलंद होत असताना पुढील राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 Comments