“माझा ध्यास काँग्रेस, श्वास काँग्रेस!” – राहुल बोन्द्रे यांचा ठाम निर्णय.
शिवसेना प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या ; भाजपवर प्रपोगंडाचा आरोप
चिखली (द बातमीवाला /छोटु कांबळे ) : चिखली विधानसभा मतदारसंघात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, माजी आमदार तथा काँग्रेस कमिटीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत फेटाळून लावत ठाम भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट शेअर करत त्यांनी “माझा ध्यास काँग्रेस... श्वास काँग्रेस” असा ठाम नारा देत आपली पक्षनिष्ठा पुन्हा अधोरेखित केली.
येत्या ५ एप्रिल रोजी राहुल बोन्द्रे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्यांना त्यांनी “एप्रिल फूल”, “प्रपोगंडा” आणि “खोट्या बातम्या” असे संबोधत चिखली भाजप कार्यालयातून अशा अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा गंभीर आरोप केला. यापूर्वीही अनेक वेळा आपल्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरवण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
राहुल बोन्द्रे यांनी पुढे आरोप करताना सांगितले की, देशभरात आणि महाराष्ट्रात विरोधी पक्षातील नेत्यांना दबाव, प्रलोभन आणि विविध यंत्रणांचा वापर करून सत्ताधारी पक्षात आणण्याची पद्धत सुरू आहे. “माझ्यावरही सातत्याने दबाव टाकण्यात आला, माझ्या संस्थांवर तक्रारी करून माझ्यावर आणि माझ्या सहकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार झाले,” असा दावा त्यांनी केला.
स्थानिक भाजप नेत्यांवर, व नेतृत्वावर टीका करताना त्यांनी म्हटले की, “मी काँग्रेसमध्ये ठामपणे उभा असल्यामुळे काहींना भीती वाटते. त्यामुळे मला पक्ष सोडायला भाग पाडण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करत आहेत. मात्र, प्रत्येक दबावानंतर मी आणखी मजबूत होत आहे.”
“मी सत्ताधारी पक्षात जाण्याचा मोह टाळून माझ्या विचारांशी प्रामाणिक राहणार आहे. माझी पक्षनिष्ठा आणि स्वाभिमान विक्रीसाठी नाही,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. शेवटी बोलतांना त्यांनी “ जय काँग्रेस आणि फुले-शाहू-आंबेडकरांचा विजय असो” असा नारा देत त्यांनी आपली विचारधारा स्पष्ट केली.
नेमके राहुल बोंद्रे काय म्हणाले हे बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.facebook.com/share/v/17p6nS3yHg/

0 Comments