APMC : "चर्चा अनेकांची... पण माळ पडली समाधान सुपेकरांच्या गळ्यात !"

चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड

महाविकास आघाडीच्या एकमताने शिक्कामोर्तब; राजकीय चर्चांना पूर्णविराम



चिखली /(द बातमीवाला )- चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अखेर समाधान सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सभापतीपदासाठी विविध नावांची चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व संचालकांनी एकमताने सुपेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने शनिवारी (दि. १३ जून) ही निवडणूक अविरोध पार पडली.

काँग्रेसचे माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार रेखाताई खेडेकर तसेच शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने बाजार समितीत एकहाती सत्ता मिळविल्याने सभापतीपद महाविकास आघाडीच्याच वाट्याला जाणार हे जवळपास निश्चित मानले जात होते. 

विद्यमान सभापती डॉ. संतोष वानखडे यांच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर सभापतीपदासाठी अनेक इच्छुकांची नावे चर्चेत होती. दरम्यान, महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांनी संचालकांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. अखेर सर्व मतमतांतरे बाजूला ठेवत समाधान सुपेकर यांच्या नावावर एकमत साधण्यात आले. प्राधिकृत अधिकारी राजेंद्र घोंगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण झाली. सभापतीपदासाठी अन्य कोणताही अर्ज दाखल न झाल्याने समाधान सुपेकर यांची सभापतीपदी बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.        

समाधान सुपेकर यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा मोठा अनुभव असून त्यांनी तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली आहे. निवडीनंतर बाजार समिती परिसरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महाविकास आघाडीचे नेते, संचालक, पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

कृषी क्षेत्राच्या विकासासाठी प्राधान्य

निवडीनंतर समाधान सुपेकर यांनी बाजार समितीतील शेतकरी हिताच्या योजना अधिक प्रभावीपणे राबविणे, बाजार व्यवस्थापन मजबूत करणे आणि शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देणे यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची भूमिका व्यक्त केली.

Post a Comment

0 Comments