"साथ जियेंगे, साथ मरेंगे" : प्रेमाचा अतूट बंध ; परिहार दांपत्याची एकत्र शेवटची यात्रा

"पतीच्या जाण्यानंतर पत्नीही गेल्या चिरनिद्रेत"

जीवनभर साथ दिलेली जोडी मृत्यूतही साथ सोडली नाही....



ढोड्रा /दे. राजा ( छोटू कांबळे) –“जिथे दोन जीवांचा संसार एकमेकांशिवाय अपूर्ण असतो, तिथे प्रेमाचा धागा इतका घट्ट असतो की मृत्यूही त्याला तोडू शकत नाही.” देऊळगाव राजा तालुक्यातील ढोड्रा गावातील मोतीसिंग फतेसिंग परिहार (वय 75) आणि त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा परिहार (वय 65) यांनी आज हेच दाखवून दिले.

मोतीसिंग परिहार यांना आज दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी चार वाजता हृदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणांतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. ही बातमी त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाईंना कळताच त्यांच्या मनावर जबर धक्का बसला. त्यांचेही हृदय थांबले आणि काही वेळातच त्या देखील चिरनिद्रेत गेल्या. संपूर्ण गावासाठी आदर्श असलेले हे दांपत्य आयुष्यभर एकमेकांच्या सावलीसारखे होते. मोतीसिंग परिहार हे माळकरी मंडळीचे आधारस्तंभ होते. त्यांनी शनी मंदिराच्या सेवेसाठी आपले जीवन वाहिले होते. सामाजिक, राजकीय आणि सांप्रदायिक क्षेत्रात त्यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात असे. अन्नपूर्णाबाई या त्यांना नेहमीच साथ देत होत्या. गावातल्या लोकांचे म्हणणे आहे, “त्यांचे प्रेम इतके निरागस आणि प्रामाणिक होते की एकाच क्षणात दोघेही या जगाचा निरोप घेतील, हे देवाने आधीच ठरवले असावे.”

अंत्यसंस्कारात भावनांचा पूर :



परिहार दांपत्याच्या निधनाने संपूर्ण गाव हळहळले. त्यांच्या पार्थिवावर आज ढोड्रा येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तो क्षण पाहताना उपस्थितांचे डोळे अश्रूंनी भरून आले. रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम दिनांक 21 एप्रिल 2025, सोमवार रोजी आयोजित करण्यात आला आहे. परिहार कुटुंबाच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी असून, त्यांच्या स्मृती कायम हृदयात जपल्या जातील.

Post a Comment

0 Comments