पैनगंगा नदीच्या पुराचा कहर ; शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळवून देऊ – आ. श्वेताताई महाले
आमदार श्वेताताई महाले पाटील यांची तात्काळ पाहणी
चिखली/ (छोटू कांबळे/ द बातमीवाला) : काल बुलढाणा शहराच्या वरच्या भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे येळगाव धरण पूर्ण क्षमतेने ओव्हरफ्लो झाले. परिणामी स्वयंचलितपणे बसविण्यात आलेले सर्व ८० दरवाजे उघडले गेले आणि प्रचंड पाण्याचा विसर्ग पैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला. या पाण्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाली.
दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती निर्माण होत असून बुलढाणा, चिखली व मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीलगतची शेतजमीन धोक्यात येते. उभी पिके वाहून जातात, तर जमिनीची सुपीक माती खरडली जाते. पण आजवर या समस्येवर कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.यंदा झालेल्या पुरामुळे किन्होळा, सवना, देवठाणा, सोमठाणा, पेठ, उत्रादा आणि पांढरदेव या गावांतील शेतांमध्ये पाणी शिरून सोयाबीनसह उभी पिके उद्ध्वस्त झाली. अनेक शेतकऱ्यांची शेती अक्षरशः वाहून गेली आहे.
पूरस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनी तातडीने सवना, किन्होळा व परिसरातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली, शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला. याप्रसंगी चिखली तहसीलदार संतोष काकडे हे आमदार सौ. श्वेताताई महाले यांच्या सोबत उपस्थित होते .
यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी संबंधित प्रशासनाला आदेश दिले की, “पूरग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून नुकसानभरपाईची प्रक्रिया वेगाने सुरू करावी. नदीलगत अर्धा किलोमीटर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना 100% नुकसानभरपाई मिळावी यासाठी मी सरकार दरबारी ठोस मागणी करणार आहे.” तसेच त्या म्हणाल्या, “निसर्ग शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेत असला तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभे राहील. शेतकऱ्यांनी या कठीण प्रसंगी धैर्य सोडू नये.” आमदारांच्या या तत्परतेमुळे पूरग्रस्त शेतकऱ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. मात्र येळगाव धरणावर दरवर्षी होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे शेतजमिनींना होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने दीर्घकालीन उपाययोजना करणे गरजेचे असल्याची मागणी आ. श्वेता महाले यांनी केली आहे. याप्रसंगी आमदार सौ महाले यांच्यासोबत भगवंतराव भुतेकर,गजानन भुतेकर , अनुरथ भूतेकर,मंगेश काटकर,ज्ञानेश्वर सालोख,सचिन भुतेकर,शरद हाडे,विष्णू भुतेकर,ज्ञानेश्वर शेळके व इतर मंडळी हजर होती.
0 Comments