अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि नागरिक अजूनही मदतीच्या प्रतीक्षेत !
आश्वासनांनंतरही दहा दिवस उलटले अद्यापही मदत नाही....
चिखली (छोटू कांबळे): १८ ऑगस्ट रोजी चिखली शहर व तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे प्रचंड हानी झाली आहे. मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर शेतकऱ्यांची कापूस, सोयाबीन, मूग, उडीद यांसारखी हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
चिखली शहर व चिखली तालुक्यातील मौजे सोमठाना, दिवठाणा, पेठ, धोतर भानगोजी, उत्रादा, दहीगाव, पांढरदेव, एकलारा, मंगरूळ नवघरे, भोरसा-भोरसी, वरखेड, घानमोड-मानमोड, अंबाशी, खैरव यांसह इतर गावांमध्ये ५ ते ७ फूट पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. घटनेनंतर सत्ताधारी पक्षाचे नेते, आमदार-खासदार त्यांचे प्रतिनिधी तसेच विरोधी पक्षाचे नेते व त्यांचे प्रतिनिधी यांनी या भागांची पाहणी करून लवकरात लवकर नुकसानभरपाई मिळवून देण्याची आश्वासने दिली होती. मात्र, आज दहा दिवस उलटून गेले तरी अद्यापही ना सानुग्रह मदत मिळाली, ना कुठल्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य प्रशासनाकडून उपलब्ध झाले आहे. यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी नाराजी असून "नुकसानभरपाई मिळेल का नाही? " या चर्चांना उधाण आले आहे. नागरिकांनी प्रशासनाला तातडीने मदत सुरू करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, अजूनही काही भागात पाणी साचलेले असून आरोग्यविषयक धोके वाढत आहेत. तज्ञांनी रोगराई टाळण्यासाठी स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरज व्यक्त केली आहे.
0 Comments