बालचमूसाठी आकर्षक पिचकाऱ्यांची रेलचेल ; बाजारपेठा सजल्या
चिखली /( छोटू कांबळे ) :- होळी आणि धूलिवंदन सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने चिखली शहरातील बाजारपेठा रंगांनी सजल्या आहेत. दुकाने विविध आकारांच्या पिचकाऱ्या, नैसर्गिक रंग , साखरेच्या गाठी आणि होळीच्या इतर साहित्याने सजली असून नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
बालचमूसाठी विशेषतः रंगीबेरंगी, विविध आकारांच्या आणि आकर्षक डिझाइनच्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठेतील दुकाने सजली आहेत. सुपरहिरोच्या थीमवर आधारित पिचकाऱ्या, मोठ्या टँकमधील वॉटरगन, आणि लहान मुलांच्या हाताळणीस योग्य अशा साध्या पिचकाऱ्यांना मोठी मागणी आहे. सणाला पर्यावरणपूरक रंगांची जोड देण्यासाठी गुलाबी, निळा, जांभळा, भगवा, नारिंगी, पिवळा अशा नैसर्गिक रंगांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या रंगांसोबतच पारंपरिक पावडर रंगही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. पर्यावरणपूरक आणि त्वचेसाठी सुरक्षित रंगांची मागणी विशेषतः वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
साखरगाठींची गोडी बाजारात सज्ज
उद्या होळी सणाचे औचित्य साधून बाजारात साखरगाठींची विक्री सुरू झाली आहे. गोडसर स्वादाने आणि सणाच्या विशेषत्वाने साखरगाठींना मोठी मागणी आहे. सध्या बाजारात साखरगाठी १२० रुपये किलो दराने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी होळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत असून साखरगाठींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सणाच्या गोडव्याला आणि परंपरेला जपण्यासाठी साखरगाठींचे स्थान आजही तितकेच महत्त्वाचे आहे.
दुकाने सजली, बाजारपेठेचा माहोल रंगला
शहरातील प्रमुख बाजारपेठा होळीच्या साहित्याने बहरल्या आहेत. दुकानदारांनी मास्क, टोपी, पिचकाऱ्या आणि रंगांचे आकर्षक प्रदर्शन मांडले असून ग्राहकांची रेलचेल सुरू झाली आहे. सणाच्या उत्साहामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण दिसून येत आहे.
0 Comments