चिखली तालुक्यातील गोदरी (मल्हारवाडी) येथील जुना पाझर तलाव भिंतीला गेले मोठे तडे...
भिंतीवर भेगा, फुटण्याची भीती ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण
तलाव शेजारीच २०-२५ घरांची लोकवस्ती थेट धोक्यात
चिखली/(गणेश भवर ) :- चिखली तालुक्यातील गोदरी मल्हार वाडी शेजारील जुना पाझर तलाव सध्या गंभीर संकटात सापडला आहे. यावर्षीच्या मुसळधार पावसामुळे तलाव ओसंडून भरला असून तलावाच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहेत. या तड्यांमुळे भिंत कधीही फुटण्याची भीती निर्माण झाली असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
तलावाच्या बाजूलाच गोदरी गावातील वीस ते पंचवीस घरांची लोकवस्ती आहे. भिंत फुटल्यास या लोकवस्तीला थेट धोका असून नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय तलावाचे पाणी जर फुटले तर त्याचा प्रवाह थेट चांधई गाव व चिखली शहरातून वाहणाऱ्या जांबुवती नदीत मिळणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. विशेष म्हणजे, मागील वर्षी या तलावाच्या भिंतीला तडे गेल्याचे ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन देऊन लक्ष वेधले होते. परंतु त्या वेळी पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र यंदा मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण भरून परिस्थिती गंभीर झाली आहे. तसेच याच परिसरातील गोदरी बारी वाडी येथील तलावही पूर्ण भरलेला आहे. जर पाझर तलाव फुटला तर त्याचा थेट परिणाम या तलावावर होऊन तोही फुटण्याचा धोका संभवतो. यामुळे चांधईसह चिखली शहरासाठीही गंभीर संकट निर्माण होऊ शकते. ग्रामस्थांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. तलावाच्या भिंतीवरील तडे दुरुस्त करणे, भिंतीवर व परिसरात मोठ्या प्रमाणावर वाढलेली झाडे-झुडपे हटवणे आणि संरक्षणात्मक कामे तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. जर प्रशासनाने तातडीने लक्ष दिले नाही, तर कधीही मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिखलीला पूराचा धोका : पाझर तलाव फुटल्यास जांबुवंती नदीकाठच्या घरांना व शेतींना मोठा फटका
चिखली शहरातील जांबुवंती नदीकाठच्या घरांना व शेतजमिनींना पाझर तलावामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. १८ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे या नदीकाठच्या घरात पाणी शिरून आणि शेतीत पाण्याचा प्रचंड फटका बसून मोठे नुकसान झाले होते. सध्या गोदरी मल्हार वाडी येथील पाझर तलावाच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले असून, तो फुटल्यास त्याच भीषण परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना न केल्यास चिखली शहर व परिसर पुन्हा मोठ्या संकटात सापडू शकतो.
0 Comments