आ. श्वेताताई महाले यांची ग्वाही : "एमआयडीसीसाठी शेतकऱ्यांची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही"
चिखली ( द बातमीवाला ): "काळ्या आईच्या मशागतीतून मोत्याचे दाणे पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या लेक म्हणून, मी विधानसभेत तुमच्या आशीर्वादाने पाच वर्षांपूर्वी पोहोचले. या कार्यकाळात सदैव शेतकरी हिताचा विचार केला. माझ्या हातून कधीही शेतकरी विरोधी कार्य झाले नाही, आणि भविष्यातही होणार नाही. विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, तुमची एक इंच जमीन सुद्धा एमआयडीसीसाठी अधिग्रहित केली जाणार नाही," असे स्पष्ट शब्दांत आ. श्वेताताई महाले यांनी भालगाव, बेराळा आणि भानखेड येथील शेतकऱ्यांना आश्वासन दिले.
चिखली विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार आ. श्वेताताई महाले यांच्या प्रचारार्थ ग्रामीण भागात 'जन आशीर्वाद दौऱ्याचे' आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यादरम्यान ८ नोव्हेंबर रोजी त्यांनी भालगाव, बेराळा आणि भानखेड गावांना भेट दिली. यावेळी शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जमीन अधिग्रहणाबाबत प्रश्न उपस्थित केले, त्यावर आ. महाले यांनी स्पष्ट केले की, "राज्य शासनाकडून भालगाव, बेराळा आणि भानखेड येथील शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सहा महिने पूर्वी सुरू झाली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली होती. पण माझ्या प्रयत्नांमुळे या प्रक्रिया स्थगित केल्या आहेत आणि शासनाने निर्णय मागे घेतला आहे.
"आ. महाले म्हणाल्या, "माझ्या प्रयत्नांमुळेच शासनाने शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीसाठी न घेण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक शेतकऱ्याला याची खात्री असावी की कोणाचीही जमीन आता एमआयडीसीच्या विस्तारासाठी घेतली जाणार नाही. विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका," असे आवाहन त्यांनी केले. श्वेताताई महाले यांच्या या ग्वाहीने शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा निर्माण झाला आहे.
0 Comments