ठरलं मग... बुलढाण्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील

मकरंद जाधव पाटील बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री ; महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर



मुंबई /( द बातमीवाला ): राज्यातील बहुप्रतिक्षित पालकमंत्र्यांच्या यादीची अखेर घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही यादी जाहीर केली असून राज्यातील विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी ठरवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गडचिरोली जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बीड आणि पुणे या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा कारभार असेल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाणे आणि मुंबई शहरांचे पालकमंत्री असणार आहेत. अन्य प्रमुख नियुक्तींमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर आणि अमरावती, राधाकृष्ण विखे पाटील यांना अहिल्यानगर, तर हसन मुश्रीफ यांना वाशिम जिल्ह्याची जबाबदारी मिळाली आहे. अकोला जिल्ह्याचे ॲड. आकाश फुंडकर, चंद्रकांत पाटील सांगलीचे, गिरीश महाजन नाशिकचे, आणि गुलाबराव पाटील जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्त झाले आहेत. याशिवाय, पंकजा मुंडे यांना जालना, शंभूराज देसाई यांना सातारा, आदिती तटकरे यांना रायगड, जयकुमार गोरे यांना सोलापूर, आणि नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कारभार देण्यात आला आहे. राज्यातील नव्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

0 Comments