चिखली नगर परिषदेच्या गैरप्रकारांवर युवासेनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार ; चौकशी व कारवाईची मागणी
चिखली (द बातमीवाला) – चिखली नगर परिषदेमध्ये सध्या प्रशासनाच्या ताब्यात असलेला कारभार बेकायदेशीर निविदा प्रक्रिया, ठराविक ठेकेदारांना दिली जाणारी कामे आणि घाणीचे साम्राज्य यामुळे नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरत आहे. या परिस्थितीवर युवासेना शहर प्रमुख आनंद गैची यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
नगर परिषदेतील अनागोंदी कारभारामुळे संपूर्ण शहरात अस्वच्छता आणि गैरप्रकार वाढले आहेत. सफाईचे काम देण्यात आलेल्या अशोक एंटरप्रायझेस या कंपनीची वर्क ऑर्डर ३१ ऑगस्ट २०२४ रोजी संपली असूनही, बोगस पद्धतीने हीच कंपनी कामे करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शहरातील घंटागाड्या बंद असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचलेले आहेत. सार्वजनिक मूत्रालये घाणीने भरलेली असून, नाल्यांची सफाई बंद असल्याने रस्त्यांवर कचरा पसरत आहे.
यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहे. तसेच, बोगस मजुर दाखवून अनधिकृत पद्धतीने बिले काढली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
"नगर परिषदेतील सर्व निविदांची आणि संबंधित अधिकारी-ठेकेदारांची चौकशी करून दोषींवर तातडीने कार्यवाही करण्यात यावी; अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल," असा इशारा आनंद गैची यांनी दिला आहे.
शहरातील या परिस्थितीवर प्रशासनाने तत्काळ लक्ष घालावे आणि नागरिकांना न्याय मिळावा, अशी मागणी वाढत आहे.
0 Comments