एसटी बसच्या धडकेत युवक ठार, दुसरा गंभीर जखमी
चिखली - बुलढाणा रोडवरील सवना फाट्यानजीक एसटी बसची भीषण दुर्घटना ; भंगार बसगाड्यांमुळे रस्त्यांवर वाढती अपघातांची मालिका
चिखली / ( छोटू कांबळे ) : चिखली-बुलढाणा रोडवरील सवना फाटानजीक येथे आज दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन युवकांना पाठीमागून भरधाव एसटी बसची धडक बसली. या भीषण अपघातात एक युवक जागीच ठार झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
या अपघातात तीस वर्षीय आलोक शामलाल शिंगणे याचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षय रमेश पट्टे (वय २६) हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिखलीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिखलीहून जळगावकडे जाणारी एसटी बस (MH-20/BL-1936) भरधाव वेगाने जात असताना सवना फाट्याजवळ हा अपघात घडला. घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, बुलढाण्याकडून येणाऱ्या वाहनाच्या तेजस्वी प्रकाशामुळे बसचालकाचा ताबा सुटला आणि समोरून पायी चालणाऱ्या दोन युवकांना बसने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आलोक शिंगणे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तर जखमी अक्षय पट्टे याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
एसटी महामंडळाच्या भंगार बसगाड्या अपघातास कारणीभूत
या अपघाताने एसटी महामंडळाच्या बसगाड्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. संबंधित बसगाडीमध्ये योग्य प्रकारे दिवे कार्यरत नसल्याचे बोलले जात आहे. दिव्यांचा अभाव आणि खराब स्थितीमुळे अशा भंगार बसगाड्या अपघातांना निमंत्रण देत असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
नागरिकांचा रोष:
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, एसटी महामंडळाच्या निष्काळजीपणावर त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे. वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी एसटी बसगाड्यांची नियमित तपासणी आणि देखभाल होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत असून, मृत आणि जखमीच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे न्याय आणि मदतीची मागणी केली आहे.
0 Comments