तपासणीत आढळल्या अनेक त्रुटी ; बुलढाण्याच्या पाळणाघरासह चिखलीमधील एका संस्थेचा समावेश
चिखली /( छोटू कांबळे) :- बुलढाणा येथील पाळणार घर आणि चिखलीतील माजी आमदारांच्या एका संस्थेअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सखी निवासात जिल्हा महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या पथकाने केलेल्या तपासणीत असंख्य त्रुटी आढळून आल्या. दोन्ही संस्थांच्या व्यवस्थापनावर कडक ताशेरे ओढण्यात आले.नियम पायदळी तुडविल्याबद्दल जाब विचारत त्रुटीच्या पूर्ततेसाठी आठ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी केंद्र शासन पुरस्कृत वसतिगृह योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत ज्या महिला नोकरी करतात, त्यांना सुरक्षित निवासाकरिता वसतिगृह उपलब्ध करून दिले जाते. यासाठी शासनाच्या अनेक नियम व अटींची पूर्तता करावी लागते. महिलांना या वसतिगृहामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास अथवा समस्या निर्माण होणार नाहीत, याकडे लक्ष देण्यासाठी महिला व बाल विकास आयुक्तालयामार्फत वेळोवेळी या वसतिगृहांची तपासणी करण्यात येते. तसा तपासणी अहवाल मागविण्यात येतो. बुलढाणा येथे डॉ. पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानद्वारा संचालित श्रीमती द्वारकाबाई चौरे हे सागवन परिसरातील रामनगरमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह आहे. तर दुसरे वसतिगृह चिखली येथे आहे. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा शिक्षण संस्थेद्वारा संचलित अहिल्यादेवी होळकर नोकरी करणाऱ्या महिलांचे वसतिगृह असे त्याचे नाव आहे. हे वसतिगृह साकेगाव रोडने अनुराधानगरमध्ये चालविले जाते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार या वसतिगृहाचे अध्यक्ष आहेत. काही दिवसांपूर्वी या दोन्ही संस्थांर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी या ठिकाणी अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या. त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे सादर केला. दोन्ही संस्थांनी तत्काळ त्रुटींची पूर्तता करून अहवाल आठ दिवसांच्या आत आयुक्तालयास सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
पाळणाघरातील गंभीर दोष
बुलढाणा येथील डॉ. पंजाबराव देशमुख प्रतिष्ठानद्वारा संचालित श्रीमती द्वारकाबाई चौरे नोकरी करणाऱ्या महिलांच्या वसतिगृहात आढळलेल्या त्रुटी अशा : संस्थेने आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. वसतिगृहामध्ये निकषानुसार प्रवेश दिला जात नाही. व्यवस्थापन समिती गठित करण्यात आलेली नाही. वसतिगृहात ३९ प्रशिक्षणार्थी मुली आणि एकच नोकरी करणारी महिला निवासी आहे. याशिवाय वसतिगृहाचे कामकाज मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही. कर्मचारी संख्या अपुरी आहे. संस्थेने निकषानुसार दस्ताऐवज ठेवलेले नाहीत. स्वच्छता दिसून आली नाही. सदरील संस्था मुलींसाठी वसतिगृह म्हणून चालविण्यात येत आहे. सदर मुलींकडून दरमहा १ हजार, ११०० व १४०० रुपये या प्रमाणे मासिक भाडे आकारण्यात येते. इतर कोणताही लाभ, सुविधा संस्थेकडून प्रवेशितांना दिल्या जात नाहीत.
चिखलीच्या संस्थेतील त्रुटी
चिखली येथील अहिल्यादेवी होळकर महिला वसतिगृहाची तपासणी केली असता संस्थेने आवश्यक माहिती उपलब्ध करून दिली नाही. निकषानुसार प्रवेश दिला जात नाही. व्यवस्थापन समिती गठित नाही. नोकरी करणाऱ्या महिलांपेक्षा प्रशिक्षणार्थी अधिक दिसून येतात, नोकरी करणाऱ्या महिला संबंधित संस्थेतच शिक्षिका असल्याचे दिसून आले. वसतिगृहचे कामकाज मार्गदर्शक सूचनांनुसार होत नाही, निकषानुसार दस्तऐवज ठेवलेले नाहीत, अशा प्रकारच्या गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत.
व्यवस्थापन सुधारण्याची गरज
एकीकडे आपल्या लाडक्या बहिणींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी शासनाने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तसेच मुलींच्या शिक्षणासाठी 'बेटी पढाव बेटी बचाव' अभियानही राबविले जात आहे. माता, भगिनी आत्मनिर्भर होण्यास सुरुवात झाली असताना दोन्ही संस्थांमध्ये आढळून आलेल्या काही त्रुटींमुळे संस्थाचालकांच्या मूळ हेतूवर संशय व्यक्त होत आहे.
0 Comments