उन्हाळ्यात 806 गावात पाणी टंचाईची चिन्हे !

जिल्हयात मार्च मध्येच पाणी टंचाई ; आराखड्यात आठशे गावे 

खाजगी विहिरींच्या अधिग्रहणाद्वारे तहान भागवण्याचा प्रयत्न

भूजल सर्वेक्षणानंतर जिल्ह्यात पाणीटंचाईचा आराखडा तयार



बुलढाणा /( छोटू कांबळे ) : मागील वर्षीच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाला असतानाही यंदा मार्च महिन्याच्या प्रारंभीच पाणी टंचाईने डोके वर काढले आहे. हजारो गावकऱ्यांची तहान या विहीर भागवीत आहे. 

  मागील वर्षीच्या पावसाळयात  समाधानकारक पावसाची नोंद झाली. अवकाळी आणि  परतीच्या पावसाने तेरा पैकी अर्ध्या अधिक तालुक्यात पावसाने वार्षिक सरासरी पर्जन्यमानाचा  आकडा ओलांडला. यामुळे यंदा पाणी टंचाईची तीव्रता कमी राहील असा अंदाज वर्तविण्यात आला. मात्र हा प्राथमिक अंदाज चुकीचा ठरला. यंदाच्या उन्हाळ्यात फेब्रुवारी अखेर आणि मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणी टंचाईने डोके वर काढले. जिल्ह्यातील देऊळगाव राजा  तालुक्यात टंचाईची तीव्रता जास्त असल्याचे चित्र आहे. या तालुक्यातील चार गावांना  आठ अधिग्रहित खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. अंढेरा  गावासाठी चार खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहे. यामुळे या गावाची तहान अधिग्रहित विहिरीद्वारेच भागवली जात आहे.  याच तालुक्यातील डोड्रा, बोराखेडी बावरा, डिग्रस खुर्द या गावांना चार खाजगी विहिरीद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. तसेच मेहकर तालुक्यातील शेंदला, लोणार तालुक्यातील कौलखेड आणि शेगाव तालुक्यातील जानोरी या गावातील रहिवासियांना खाजगी विहिरीतून होणाऱ्या पाणी पुरवठ्या द्वारेच आपली तहान भागवावी लागत आहे. मेहकर तालुक्यातून विहीर अधिग्रहण चे आणखी दहा प्रस्ताव जिल्हा प्रशासन व पाणी पुरवठा विभागाकडे सादर करण्यात आले आहे. 

 

दरम्यान यंदाच्या उन्हाळ्यात  जिल्ह्यातील १४१० पैकी  ८०६ गावात पाणी टंचाईची समस्या  भेडसावणार असा यंत्रणाचा अंदाज आहे. भूजल सर्वेक्षण यंत्रणा , जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही बाब आढळून आली आहे. यानंतर तयार करण्यात आलेल्या पाणी टंचाई कृती आराखड्यात ८०६ गावासाठी १३४३ उपाय योजनाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये टँकर आणि अधिग्रहित खाजगी विहिरी द्वारे पाणी पुरवठा, बुडकी घेणे, नवीन विंधन विहिरी, नळ योजनाची दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळ योजना, विहिरीचे खोलीकरण व गाळ काढणे, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनाचा समावेश आहे. या आराखड्यावर १६ कोटी ९६ लाख रुपये खर्च होणे अपेक्षित आहे.  मार्च अखेर २८० तर एप्रिल ते जून दरम्यान ५२६ योजनाची अंमलबजावणी होण्याची अपेक्षा आहे.

Post a Comment

0 Comments