चिखलीत काँग्रेसला धक्का : ज्येष्ठ नेते रफिक शेठ कुरेशी यांचा भाजपमध्ये प्रवेश
मुंबई /( छोटू कांबळे) : चिखली विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपनगराध्यक्ष रफिक शेठ कुरेशी तसेच सलीम मण्यार, आणि रशीद भाई यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मुंबई येथे आज दिनांक ७ मे रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चिखलीच्या आमदार सौ. श्वेता ताई महाले पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
रफिक शेठ कुरेशी यांचा भाजप प्रवेश चिखली काँग्रेससाठी मोठी नुकसानकारक घटना मानली जात आहे. या प्रवेशामुळे आगामी नगरपालिका निवडणुकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रफिक शेठ हे चिखली परिसरात प्रभावशाली नेते मानले जातात. त्यांच्या पक्षांतरामुळे भाजपचा चिखलीतील आधारभूत मतदारसंघ आणखी मजबूत होणार आहे. यामुळे काँग्रेसची आगामी निवडणुकांतील रणनीती अडचणीत येण्याची शक्यता आहे.
या पक्षप्रवेशाबद्दल बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, "रफिक शेठ कुरेशी यांचा पक्षात प्रवेश म्हणजे भाजपच्या कार्यशैलीवर असलेला विश्वास आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा भाजपला मोठा फायदा होईल.
"आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांनीही रफिक शेठ यांच्या प्रवेशाचे स्वागत करताना सांगितले की, "चिखलीच्या विकासासाठी भाजपची ताकद वाढवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरेल."
रफिक शेठ कुरेशी यांच्या भाजप प्रवेशाने चिखलीतील राजकीय समीकरणे बदलणार असून, याचा आगामी स्थानिक निवडणुकांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.
0 Comments